पोलीस गाडी गेल्यावर रिकामटेकड्यांची गर्दी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:29+5:302021-03-22T04:15:29+5:30
पोलीस माघारी फिरताच गर्दी नशिराबादला अजाणतेचे प्रदर्शन नशिराबाद : नशिराबादमध्ये अजुनी अनेक ठिकाणी तरुणांचा घोळका, दुकाने, दूध व्यवसाय, ...
पोलीस माघारी फिरताच गर्दी
नशिराबादला अजाणतेचे प्रदर्शन
नशिराबाद : नशिराबादमध्ये अजुनी अनेक ठिकाणी तरुणांचा घोळका, दुकाने, दूध व्यवसाय, बॅँक, दैनंदिन बाजारात गर्दी कायमच असून वारंवार प्रशासनाने सूचना देऊनही सोशल डिस्टन्सला ठेंगा दाखवला जात आहे. प्रशासनाच्या सूचनांना हरताळ फासत आहेत. पोलीस गाडी जाताच अनेक जण रस्त्यावर पुन्हा येतात व घोळका करीत अजाणतेपणाचे प्रदर्शन घडवितात.
कोरोना विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावाने देशात सर्वांची झोप उडवली आहे.
खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्ससह विनाकारण बाहेर फिरणे, गर्दी टाळणे आवश्यक आहे; मात्र या सर्व बाबींना अनेक जण हरताळ फासत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. नशिराबाद येथे प्रमुख रस्त्यांसह विविध चौकांमध्ये तरुणांचा घोळका कायम दिसत आहे. रात्रीला चौकाचौकात तरुणांचा घोळका कायम दिसतो. टवाळखोरांना पोलिसांनी खाकीचा प्रसाद दिला होता. सध्या गावात कोरोना डोकं वर काढू पाहत आहे. सर्वांनी याचे गांभीर्य घेतले पाहिजे.
या सर्व बाबींना बगल देत अनेकजण रस्त्यावर विनाकारण हिंडतांना दिसत आहेत. वेशीवर असलेला हा कोरोना केव्हा दारात येईल हे सांगता येत नाही त्यासाठी खबरदारी घ्या सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करा. नियम पाळा असे आवाहन करण्यात येत आहे.
गावात पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र साळुंखे व सहकारी ध्वनिक्षेपकातून वारंवार नागरिकांना खबरदारीच्या सावधानतेच्या सूचना देत आहेत. दरम्यान, पोलीस गाडी दिसताच रात्री घोळका करून उभे असलेले तरुण लागलीच पळ काढतात; मात्र पोलीस गाडी माघारी जाताच पुन्हा तरुण गर्दी करतात. ही स्थिती आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला साथ द्या, नियमांचा अवलंब करा, मास्क, रुमालचा वापर करा असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.