भुसावळ : यंदा प्रथमच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा संपली असून, गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दी उसळली होती. बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रसाद, फुले, गणेश मूर्ती आरास खरेदी करताना चित्र बाजारपेठेत पाहण्यास मिळाले.कोरोना पार्श्वभूमीवर चार फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीला शासनाने परवानगी नाकारली आहे. घरच्या घरीच गणपती उत्सव साजरे करा, असे शासनाचे निर्देश आहे. निर्देशाचे पालन करून गणेश भक्तांनी बाजारपेठेमध्ये गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अगदी १०० रुपयांपासून तर दोन हजारांपर्यंतच्या मूर्र्तींना मागणी आहे. परवानगी असलेल्या मंडळांनी लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी भव्य आरास उभारणीचे कार्य सुरू केले आहे. श्री गणेश मंडळासह घरोघरी गणपती बाप्पा बसल्याने लहान मुलांपासून तर मोठ्यांची दुपारपासूनच गणपतीच्या मूर्ती व सजावटीसाठीचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात खरेदीसाठी गर्दी केलेली दिसत होती. शनिवारपासून सलग १० दिवस या उत्सवाचा उत्साह, जल्लोष राहणार आहे.नारळ, फूल, सजावट पूजा साहित्याची दुकाने थाटलीगणरायाच्या आगमनानिमित्त शहरातील बाजारपेठेत विशेषत: वसंत टॉकीज चौक, जामनेर रोड, बाजारपेठ परिसर व शहरातील मुख्य चौकांमध्ये विविध वस्तुंची दुकाने लावण्यात आलेली आहे. बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारच्या सजावटीचे वस्तूंची दुकाने फुललेली आहेत. यात मखर, पताका, मोत्याचे हार, चमकी पट्टी बॉल, लाइटिंग आदी साहित्याने दुकाने सजली आहेत. तसेच पूजेसाठी केळीचे खांब, दुर्वा, फळ, आंब्याची पानेदेखील विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे. उद्या गणेश चतुर्थीला मोठी गर्दी असेल म्हणून एक दिवस अगोदरच भक्तगणांनी सजावटीचे व पूजा साहित्य खरेदी केले.विविध रूपातील मूर्तीसाठी नागरिकांची धावपळमूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलवर बाप्पाचे विविध रूपातील सुबक मूर्ती पाहण्यास मिळाले. यात कोरोना पार्श्वभूमीवर मास्क परिधान केलेले बाप्पा, यानंतर बालगणेश मूर्ती लहान मुलांना भावत आहे. तसेच शाडू मातीच्या मूर्तींनादेखील नागरिकांकडून मागणी आहे.ज्या नागरिकांनी आधीच मूर्ती बुकिंगची आॅर्डर दिली होती ते आपापल्या मूर्ती विक्रेत्याकडून घेऊन जाण्यासाठी धावपळ गर्दी करतानाचे चित्र बाजारपेठेत दिसून आले.
भुसावळात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 9:56 PM