रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९४ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:01+5:302021-06-01T04:13:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ हजार ८१३ वरून ५ हजार ९१५पर्यंत म्हणजेच निम्म्याने ...

The cure rate reached 94% | रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९४ टक्क्यांवर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९४ टक्क्यांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ हजार ८१३ वरून ५ हजार ९१५पर्यंत म्हणजेच निम्म्याने घटली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे सतत वाढते आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात पहिल्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजारांच्या आसपास गेली होती. मात्र कडक निर्बध, केलेल्या विविध उपाययोजना, माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान व संशयित रुग्ण शोधमाेहीम यामुळे जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आले होते. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजारांवरून ३०४ पर्यंत (६ फेब्रुवारी २०२१ रोजी) खाली आणण्यात यंत्रणेला यश आले होते. मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यास सुरुवात झाली होती. या लाटेत जिल्ह्यात दररोज हजारो बाधित रुग्ण आढळून येत होते. १ एप्रिल रोजी जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या ११ हजार ८१३ या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. मात्र ब्रेक द चेनअंतर्गत जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले. शिवाय बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णांचा शोध घेऊन कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून वेळेत उपचार झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर वाढलेच शिवाय मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश आले. सध्या जिल्ह्यात ५ हजार ९१५ सक्रिय रुग्ण आहेत.

चार हजारांवर रुग्ण होमक्वारंटाइन

जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख ५० हजार ७८३ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यापैकी १ लाख ३९ हजार ८२७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर १० लाख ७ हजार ९२५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या ४ हजार ७२२ रुग्ण होमक्वारंटाइन असून, २१२ रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ५ हजार ९१५ सक्रिय रुग्णांपैकी ४ हजार ९०४ रुग्ण लक्षणे नसलेले, तर १ हजार ९ रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Web Title: The cure rate reached 94%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.