गिरणा धरणातील आवर्तनाचे पाणी पोहचल्याने दहिगाव बंधारा ‘ओव्हरफ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 01:02 AM2018-11-13T01:02:50+5:302018-11-13T01:06:39+5:30
गिरणा धरणातील आवर्तनाचे सोडलेले पाणी दहिगाव बंधाऱ्यात रविवारी पहाटे पोहचल्यानंतर हा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे गिरणा नदीच्या काठावरील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
एरंडोल : गिरणा धरणातून ५ नोव्हेंबर रोजी सोडलेले पाणी जामदा बंधारा, भडगाव बंधारा, पाचोरा व गिरड बंधारा आणि उत्राण येथील बंधारा भरल्यानंतर रविवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दहिगाव बंधारा येथे पोहचले. साधारणपणे १२ ते १५ तास हा बंधारा भरायला लागून पहाटे दोन ते तीन वाजेपर्यंत दहिगाव बंधारा ओव्हरफ्लो झाला. सदरचे पाणी गिरणा नदीद्वारे म्हसावद तलाव, लमांजन तलाव, दापोरा तलाव भरून कानळदा गावापर्यंत देण्याचे नियोजन गिरणा पाटबंधारे यंत्रणेचे आहे. पाच ते सात दिवसात सदरचे पाणी कानळदा पर्यंत पोहोचणे अपेक्षीत आहे.
या आवर्तनामुळे गिरणेच्या काठावरील व परिसरातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, जळगाव, धरणगाव या तालुक्यामधील सुमारे १० ते १२ लाखाच्यावर लोकसंख्येचा दोन ते तीन महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दिलेल्या मंजुरीनुसार सदर बिगर सिंचनाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. गिरणा धरणापासून सुमारे १७० कि.मी.पर्यंत पाणी पोहचणे अपेक्षीत आहे. या आवर्तनाचा कालावधी १० ते १५ दिवसांचा आहे.
दहिगाव ४३ दलघफू, लमांजन ४० दलघफू, म्हसावद १५ दलघफू, दापोरा २५ दलघफू, याप्रमाणे या बंधाºयामध्ये पाणी साठविले जाणार असल्याची माहिती विभागाचे उपविभागीय अधिकारी मकरंद अत्तरदे यांनी ‘लोकमत’ला दिली .
पाणी चोरी रोखण्यासाठी उपाययोजना
पाण्याचा अवैध वापर किंवा पाणीचोरी होवू नये म्हणून स्थानिक व विभागीय स्तरावर दक्षता पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पाटबंधारे यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी हे देखील कार्यरत आहेत. याशिवाय गिरणा नदीकाठावरील गावांचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, विद्युत मंडळ प्रशासन इत्यादींना अवगत करून पाण्याचा दुरुपयोग होणार नाही याबाबत दक्षता घेतली जात आहे.