जळगावच्या दालमिल व्यापाऱ्याची १९ लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 08:52 PM2021-02-21T20:52:36+5:302021-02-21T20:52:36+5:30
दालमिल व्यापारी रमेशचंद तेजराज जाजु (वय ६३,रा.गणपती नगर ) यांची सुरतच्या व्यापाऱ्याने १९ लाख ७८ हजार रूपयांची फसवणूक
जळगाव : दालमिल व्यापारी रमेशचंद तेजराज जाजु (वय ६३,रा.गणपती नगर ) यांची सुरतच्या व्यापाऱ्याने १९ लाख ७८ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेशचंद जाजु यांच्या एमआयडीसीत आर.सी.फुड इंडीया प्रायव्हेट लिमिटेड व आदर्श कमर्शियल कार्पोरेशन या दोन कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून जिल्हा तसेच परराज्यात चना व तूर डाळ ते निर्यात करतात. यासोबतच खरेदीचाही त्यांचा व्यवसाय आहे. पैशांचा व्यवहार हा ऑनलाईन होतो. सुरत येथील मुकेश देवशीभाई कथारोटीया यांच्याशी तुर व चनादाळ व्यापाऱ्याकरीता ऑनलाईन व्यवहार २७ डिसेंबर २०२० झाला. त्यानंतर वेळोवेळी व्यवहार करून ठरलेली रक्कम पाठवित होते.त्यानुसार रमेशचंद जाजु यांनी १९ लाख ७८ हजार ५४० रूपयांची चना व तुरदाळ त्यांना पाठविली. मात्र मुकेश कथारोटीया यांनी पैसे पाठविले नाही. त्यानंतर मोबाईलच बंद केला.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जाजु यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून मुकेश कथारोटीया यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.