वाघळी येथे भर दुपारी खळ्यास आग लागून तीन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 06:45 PM2020-12-09T18:45:40+5:302020-12-09T18:46:36+5:30
शेतकरी संजय जगन्नाथ देशमुख यांचे एकलहरे सबस्टेशन जवळील शेतातील खळ्यास बुधवारी दुपारी एक वाजता अचानक आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : तालुक्यातील वाघळी येथील शेतकरी संजय जगन्नाथ देशमुख यांचे एकलहरे सबस्टेशन जवळील शेतातील खळ्यास बुधवारी दुपारी एक वाजता अचानक आग लागली. त्यात दोन दिवसापूर्वी व्यालेली गाय आणि वासरू सह एक लाखांची कुट्टी चारा, पत्राची शेड, शेतीची सर्व अवजारे असे सुमारे तीन लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत तातडीने जमलेल्या शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्याशी संपर्क करीत घटनेची कल्पना दिली. पाटील यांनी संबंधितांना तातडीने घटनास्थळावर जावून पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल पाठवा. संबधित शेतकऱ्यांस अधिकाधिक मदत मिळवून द्यावी, अशी सूचना तहसीलदार अमोल मोरे यांना केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, वाघळी गावापासून एकलहरे रस्त्यावर सबस्टेशनच्या पुढे संजय जगन्नाथ देशमुख या शेतकऱ्याने शेत जमीन कसायला घेतली आहे. वाघळी शिवारात असलेल्या शेतजमिनीवर संजय देशमुख यांच्या मालकीच्या शेडमध्ये सुमारे आठ ते नऊ गायी असून त्यांचा दुग्ध व्यवसायदेखील आहे. ९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून या खळ्यातील गाय वासरू, खळ्यातील चारा, कुट्टी, लोखंडी व लाकडी बल्यांचे पत्री शेड, शेतीचे साहित्य, दूध काढण्याची मशीन, विविध शेती अवजार हे सर्व साहित्य खाक झाले आहे.
घटनास्थळावर पोलीस पाटील जयश्री बऱ्हाटे, शेजारचे शेतकरी करीम शेख तसेच भाऊसाहेब पाटील, अरुण पाटील, दिपक पाटील यांनी घटनास्थळावर धाव घेतली. सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान या घटनेत शेतकऱ्याचे झाले असून शेतकरी घटनास्थळावर ओक्साबोक्शी रडत असल्याचे गंभीर चित्र पहायला मिळाले.
घटनास्थळी पोलीस पाटील जयश्री बऱ्हाटे यांनी तातडीने जाऊन संबंधित तलाठी, विज वितरण अधिकारी यांना घटनेच्याबाबत माहिती दिली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन शेतकऱ्याचे दुभते जनावर तसेच साहित्य, शेड जळाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.