जळगावात महाविद्यालय परिसरात ३० टवाळखोरांवर कारवाईचा दंडुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:16 PM2019-07-05T12:16:05+5:302019-07-05T12:16:30+5:30
पोलीस अधीक्षकांचे आदेश
जळगाव : मू.जे.महाविद्यालयात मुकेश सपकाळे या विद्यार्थ्याचा भरदिवसा खून झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणारे तसेच उपद्रवी ठरलेल्या ३० तरुणांवर गुरुवारी पोलिसांनी कारवाईचा दंडूका उगारला. शहर व जिल्हा पेठ पोलिसांनी संयुक्तरित्या बाहेती महाविद्यालयाच्या परिसरात मोहीम राबविली.
मुकेश सपकाळे या तरुणाच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील गुंडगिरी तसेच टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिले आहेत. महाविद्यालय प्रशासनालाही त्यांनी काही उपाययोजना व खबरदारी सुचविली आहे. गुरुवारी शहरातील सर्वच महाविद्यालयाच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवीकांत सोनवणे, जिल्हा पेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक व सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे व आरसीपी प्लाटूनसह बाहेती परिसरात नाकाबंदी करण्यात केली असता टवाळखोर व उपद्रवी ठरणाºया ३० जणांवर कारवाई करण्यात आली. त्याशिवाय महाविद्यालयाचा विद्यार्थी नसतानाही परिसरात वावर करणे, ट्रीपल सीट, भरधाव वेगाने दुचाकी चालविणायांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
विचित्र राहणीमान, हेयरस्टाईल करणारे रडारवर
निरीक्षक रवीकांत सोनवणे यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई तर केलीच, शिवाय विचित्र राहणीमान, विचित्र नंबर प्लेट, हेयर स्टाईल करुन महाविद्यालय परिसरात फिरणाºया तरुणांना भरचौकातच फैलावर घेतले. काही जणांना तर तरुणींच्यासमोरच फैलावर घेण्यात आले. आजच्या या कडक मोहिमेमुळे टवाळखोरांचा उपद्रव थांबला होता. या मोहिमेत सातत्य असावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
टवाळखोरांच्या पालकांना बोलावणार
महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणाºया तरुणांवर कारवाई करुन त्यांची पोलिसांच्या पिंजरा वाहनात रवानगी करण्यात येणार आहे. पिंजरा वाहन हे आरोपींच्या वाहतुकीसाठी असून प्रत्येक पोलीस स्टेशनला एक याप्रमाणे सहा वाहने पुरविण्यात आली आहेत. ही वाहने महाविद्यालयाच्या बाहेर थांबविण्यात येणार आहे. टवाळखोरांना सर्वांसमक्ष शिक्षा करुन वाहनात टाकण्यात येईल, त्यानंतर त्यांच्या पालकांना पाचारण केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली. पुणे येथे गणेशोत्सव विसर्जन मार्गावर मिनी कोठडी तयार करण्यात येते, त्याच धर्तीवर पिंजरा गाडी असणार आहे.
सुपेकर पॅटर्नची अंमलबजावणी
महाविद्यालयातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी युवा सुरक्षा अभियान उपक्रम राबविला होता. तरुणांचे प्रबोधन करण्यासह सायबर क्राईम, टवाळखोरी, तरुणींची छेडखानी यावर उपाययोजना करण्यासाठी तरुणांना पोलिसांशी जोडले होते. महाविद्यालय व पोलीस यांच्यात एक समन्वयक नेमला होता. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात आली होती.अमलबजावणी केली जाणार आहे.