लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरणानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या ॲन्टिबॉडिजचे आयुष्यमान हे शरीरात सहा महिन्यांपासून ते अधिकाधिक एक वर्षापर्यंतच राहते, अशा स्थितीत आता फेब्रुवारी मार्चमध्ये लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना तिसऱ्या लाटेत धोका असू शकतो, असे मत व्यक्त करीत आताच्या स्थितीत बूस्टर डोस ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात मार्चपर्यंत १० हजारांपर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण झालेले होते.
जिल्ह्यात काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्याची स्थिती आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढली असून, अन्य जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. त्यातच बुधवारी शहरात चार नवे बाधित आढळून आले होते. शहरात ९ सक्रिय रुग्ण झाले आहेत. त्यामुळे ही तिसऱ्या लाटेची चाहूल तर नाही, अशीही एक शक्यता वर्तविली जात आहे.
बूस्टर डोस गरजेचाच
ॲन्टिबॉडिजचे आयुष्य हे दुसऱ्या डोसनंतर सहा महिने व अधिकाधिक एक वर्ष राहते, त्यामुळे तिसरा अर्थात बूस्टर डोस आवश्यक असल्याचे मत शिवाय तसा अभ्यास सांगतो, असे मत औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.भाऊराव नाखले यांनी व्यक्त केले आहे. लसीकरणामुळे कोविडचे गांभिर्य कमी होते. जरी लागण झाली तरी तुम्ही त्यात गंभीर होत नाही. त्यामुळे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते सांगतात; मात्र सद्यस्थितीत सर्वांचे दोनही डोस होणे महत्त्वाचे असल्याने अद्याप बूस्टर डोसबाबत निर्णय नसल्याचेही त्यांनी सांगितले.
नियम पाळणे हेच मोठे औषध
कोविड प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी हेच सद्यस्थितीत मोठे औषध असून, त्यामुळेच आपण व इतरही सुरक्षित राहू शकतो, असा विचार सर्वांनी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विषाणू स्वत:मध्ये बदल करेल, अनेक बाबी घडतील; मात्र यापेक्षा आपण नियम जर पाळले तर आपण सुरक्षित राहू, ही बाब नागरिकांनी कायम लक्षात ठेवावी, मास्क लावणे, अंतर पाळणे व हात स्वच्छ धुवून ते नाका- तोंडाला लावणे टाळणे या बाबी पाळाव्यात, असे आवाहन डॉ.नाखले यांनी केले आहे.