यावल जि. जळगाव : गजबजलेल्या वस्तीत असलेल्या सराफ दुकानाच्या मालकाच्या मानेला पिस्तूल लावून जवळपास साडेबारा लाखांचा ऐवज लुटण्यात आला. ही थरारक घटना बुधवारी भरदुपारी एक वाजता यावल येथील कोर्ट रस्त्यावर घडली. या सराफी दुकानाचे संचालक जगदीश कवडीवाले हे शिवसेनेचे शहरप्रमुख आहेत.
या दुकानातून दरोडेखोरांनी १२ लाख रुपये किमतीचे २४० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच ५५ हजार रुपयांची रोकड लुटून नेली.
कोर्ट रस्त्यावर बाजीराव काशिदास कवडीवाले या सराफ दुकानात बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी प्रवेश केला. त्यापैकी एकाने संचालक जगदीश कवडीवाले यांच्या मानेवर गावठी कट्टा लावला आणि दुकानातील शोकेस फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे सुमारे साडेबारा लाखांचा ऐवज लुटून नेला. एकाच मोटारसायकलवरून चौघे पसार होताच चारही चोरट्यांनी दुकानाबाहेर लावलेल्या एकाच मोटारसायकलवर बसून पळ काढला.
घटनास्थळापासून सुमारे शंभर फूट अंतरावर रस्त्यामध्ये गाय बसलेली होती. त्यावेळी दरोडेखोरांनी मोटारसायकल रस्त्याच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न केला असता घाईतच त्यांची मोटारसायकल स्लिप झाल्याने ते खाली पडले. त्यावेळी त्यांच्याकडील दोन देशी कट्टे खाली पडले. तेव्हा शेजारीच राहत असलेले राजे श्रावगी यांनी बाहेर येऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका दरोडेखोराने दुसरा कट्टा श्रावगी यांच्या मानेला लावून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने गोळी सुटली नाही. मात्र दोन गावठी कट्टे पोलिसांनी जप्त केले आहेत. यापैकी एका कट्ट्यात पाच जिवंत काडतुसे, तर दुसऱ्या कट्ट्यात एक जिवंत काडतूस होते. हा प्रकार जवळच असलेल्या आयडीबीआय बँकेच्या रांगेत असलेल्या काही ग्राहकांनी पाहिला, त्यांनी या दरोडेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र यशस्वीपणे पसार होण्यात यशस्वी झाले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांसह शहरवासीयांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी भेट दिली आणि चोरट्यांचा लवकर तपास करण्यात येईल, असे सांगितले.