संजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : सध्या कोरोनाची धास्ती मनात एव्हढी बसली आहे की सोशल मीडिया उघडताच मृत्यू जास्त डोळ्यासमोर येतात , गावातून फेरफटका मारला की भावपूर्ण श्रध्दांजलीचे डिजिटल फलक लागलेले दिसतात अन साहजिक तोंडातून शब्द निघतो हे केव्हा गेले ? चांगली व्यक्ती होती हो ती ...पण या सोशल मिडीयाने आता जण कहरच केला आहे.
अमळनेरचे एक डॉक्टर अन्य उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाले आणि याची चर्चा सोशल मिडीयावर सुरु झाली.. कुणीतरी त्यांचा फोटो टाकला आणि श्रद्धांजली वाहण्याची रांगच लागली... आणि या डॉक्टरांनी जिवंतपचीण मरण माझे मरोनि गेले... या संत तुकाराम महाराजांचा अभंगाचा अनुभव घेतला.
बालरोग तज्ज्ञ डॉ. नितीन पाटील यांच्याबाबतीत घडला. एक आजारासाठी ते दवाखान्यात दाखल झाले. आणि त्याच काळात कोरोनाचा कहर वाढला होता. एकाने पोस्ट टाकली की डॉ. नितीन हे दवाखान्यात दाखल झाले .. अन काय विचारता पूर्ण न वाचताच एका पाठोपाठ भावपूर्ण श्रद्धांजली सुरू झाली. आणखी काही दिवस गेले त्यांची प्रकृती खराब झाली म्हणून चर्चा गावात पसरली अन सायंकाळपर्यंत डॉ. नितीन यांचे वाईट झाले म्हणत उलट सुलट चर्चा वाऱ्यासारखी पसरली.
त्यांचे मित्र डॉ. शरद बाविस्कर यांनी सोशल मिडीयावर सांगितले की मी आताच त्यांच्याशी बोललो तेव्हा कुठे अफवा थांबल्या. मंगळवारी डॉ. नितीन पाटील दुरुस्त होऊन सुखरुप घरी पोहचले. आता आपण लवकरच नियमित सेवेत हजर होणार असा संदेश त्यांनी टाकला. तरीही सोशल मीडिया जोरात चालवणारे मात्र वाचन न करणाऱ्यांनी पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश टाकले. पुन्हा डॉ. पाटील यांच्या मित्रपरिवाराने ते सेवेत हजर होणार असल्याचे सांगितल्यावर हा प्रकार थांबला.
श्रध्दांजली वाहण्याची घाई..
सोशल मीडियावर निवड, अभिनंदन, वाढदिवस, लगीनदिन यासाठी फोटो टाकायचा अवकाश असतो तेवढ्यात भावपूर्ण श्रद्धांजली चे १० संदेश पडतात अन नंतर वाढदिवस असल्याचे कळते पुन्हा संदेश मिटवण्याची नामुष्की येते.