आठ दिवसात १० शिक्षकांचा मृत्यू, तांडव सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 09:26 PM2021-04-05T21:26:37+5:302021-04-05T21:48:23+5:30
गेल्या आठ दिवसात कोरोना संशयित आजाराने १० कार्यरत शिक्षक तर तीन सेवानिवृत्त अशा १३ शिक्षकांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यात गेल्या आठ दिवसात कोरोना संशयित आजाराने १० कार्यरत शिक्षक तर तीन सेवानिवृत्त अशा १३ शिक्षकांचामृत्यू झाला आहे तर ५ रोजी कोविड रुग्णालयात उपचार घेताना ८ जणांचा मृत्यू झाला आहे. आज १२५३ चाचण्या घेण्यात आल्या असून कोरोनाने आज शंभरी गाठली.
अमळनेर तालुक्यात राहणाऱ्या १० कार्यरत शिक्षकांना आणि तीन सेवनिवृत्त शिक्षकांना कोरोनाच्या संसर्गाची लागण झाल्याने अवघ्या आठ दिवसात त्यांचा मृत्यू झाला आहे. बोळे आश्रम शाळेचे शिक्षक हेमकांत पाटील यांच्या पाठोपाठ त्यांचे सहकारी विशाल संतोष संदानशीव यांचाही मृत्यू झाला आहे. पातोंडा शाळेचे शिक्षक व शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष जगदीश पवार, अंतुर्ली आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजय चंदनखेडे, चौंबारी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक के. एन. पाटील, मारवडचे रहिवासी ग्रंथपाल राजेश वसंतराव साळुंखे, इंदिरा गांधी विद्यालयाचे बाळासाहेब अमृत देशमुख, दिलीप बाबुराव चव्हाण यांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे तर काही महिन्यांपूर्वी याच शाळेच्या शिक्षिका शोभाबाई अशोक पाटील यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
ग. स. हायस्कुल मागे राहणारे पारोळा कॉलेजचे प्रा. प्रवीण येवले, जिल्हा परिषदेचे शिक्षक जितेंद्र बिऱ्हाडे यांचाही कोरोनाने मृत्यू झाला तर शिरूड माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भागवत वना चव्हाण, सावखेडा शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक गणपत बैसाणे, मारवडचे निवृत्त शिक्षक राजेंद्र जगन्नाथ साळुंखे यांनीही कोरोनामुळे जीव गमावला आहे. तालुक्यात ५ रोजी ग्रामीण भागात ५४२ चाचण्या करण्यात आल्या असून २६ जण पॉझिटिव्ह आले आहेत तर शहरात ७११ चाचण्या करण्यात आल्या त्यात ७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान ५ रोजी देखील शहरात विविध रुग्णालयातील ८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर पैलाड स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विमलबाई भिकन निकुंभ (आल्हाद नगर), सुभाष शंकरशेठ वाणी (रेल्वे स्टेशनजवळ मुठे चाळ), राकेश शंकर पाटील (विखरण नंदूरबार), सुरेश बाबुराव कापडणे (जिजाऊ नगर, ढेकूरोड), रवींद्र रघुनाथ पवार (मंदाणे ता. शहादा), लीलाधर पांडुरंग पाटील (वासरे), गणपत आस्मान बैसाणे (ओंमशांतीनगर, शिरूड नाका), चंद्रशेखर रमेश पाटील (निंभोरा) यांचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे.