कोरोनाबाधित गर्भवती महिलेला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:11+5:302021-07-19T04:12:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गर्भपिशवीत पाणी कमी झालेल्या, श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या कोरोनाबाधित गर्भवती महिलेवर शस्त्रक्रिया करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गर्भपिशवीत पाणी कमी झालेल्या, श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या कोरोनाबाधित गर्भवती महिलेवर शस्त्रक्रिया करून जीव वाचविण्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला यश आले आहे.
शनिवारी ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महिलेचे बाळही सुखरूप आहे. धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील २६ वर्षीय विवाहिता गर्भवती होती. तसेच तिला कोरोना आजार जडल्यामुळे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६ जुलैला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र कक्षात दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय पथकाने विवाहितेची तपासणी करून तत्काळ सिझर करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कक्षाचे विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकृष्ण चव्हाण, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. जितेंद्र कोळी, डॉ. सुधीर पवनकर, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. चंदन महाजन यांनी महिलेची सुखरूप प्रसूती करून बाळ आणि बाळंतिणीला वाचविण्यात यश मिळविले. वैद्यकीय पथकाला बधिरीकरण शास्त्र विभागाचे डॉ. सचिन पाटील, डॉ. स्वप्निल इंकणे, बालरोग व चिकित्सा विभागाच्या डॉ. निलांजना गोयल, अधिपरिचारिका माधुरी ठोके, निला जोशी, गायत्री पवार, चारुशिला पाटील यांनी सहकार्य केले.
गंभीर आजारांची होती लागण
या महिलेला हृदयाचा आजार आणि उच्चरक्तदाब असून, गर्भपिशवीत पाणी कमी होते. ३९ आठवड्याच्या योग्य कालावधीतच या महिलेची सुखरूप प्रसूती झाली. महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे वजन २ किला ८०० ग्रॅम भरले.