तरुणाचा मृत्यू, डॉक्टरांनी तपासणी न केल्याचा नातेवाइकांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:31+5:302021-07-29T04:17:31+5:30
जीएमसीत तणाव : मृत प्रयोगशाळेतीलच कर्मचारी, ईसीजी मशीन बंद, प्रकरणाच्या चौकशीचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाघनगरातील रहिवासी ...
जीएमसीत तणाव : मृत प्रयोगशाळेतीलच कर्मचारी, ईसीजी मशीन बंद, प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाघनगरातील रहिवासी तसेच जीएमसीच्या प्रयोगशाळेतील सहायक नरेंद्र चंद्रकात परदेशी (२८) या तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी दुपारी मृत्यू झाला. तो घरी असतानाच त्याला झटका आला. त्याला रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी ड्युटी संपल्याचे कारण देत तपासणी केली नाही, शिवाय ईसीजी मशीनच बंद होते, असा आरोप नातेवाइकांनी केला तसेच डॉक्टरांना तातडीने निलंबित करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. डॉक्टरांनी समजूत घातल्यानंतर दुपारी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
नरेंद्र परदेशी हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रयोगशाळेत पहिल्या दिवसापासून कंत्राटी तत्त्वावर सहायक म्हणून कार्यरत होता. त्याची दुपारी दोन वाजेची शिफ्ट होती. तो नेहमीप्रमाणे लॅबमध्ये येण्याची सकाळी तयारी करीत होता. मात्र, साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक त्याला मळमळ होऊ लागली व तो चक्कर येऊन खाली पडला. त्याच्या नातेवाइकांनी तातडीने त्याचा भाऊ चेतन परदेशी यास ही माहिती दिली. नरेंद्रला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. नरेंद्र हा रुग्णालयात आणेपर्यंत जिवंत होता. मात्र, या ठिकाणी डॉक्टरांनी ‘आमची ड्युटी संपली, आम्ही तपासत नाही’, असे सांगत तपासणी केली नाही, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. शिवाय या ठिकाणच्या दोनही ईसीजी मशीन बंदच होत्या. त्यामुळे तपासणीच झाली नाही, असेही नातेवाइकांनी सांगितले. यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती. नरेंद्रच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी नातेवाइकांनी केली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे कामानिमित्त धुळे येथे गेले होते. डॉ. मारोती पोटे यांच्याकडे प्रभारी पदभार होता. त्यांनी आपत्कालीन कक्षात जाऊन नातेवाइकांची समजूत काढली व चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत या ठिकाणी असे दुर्लक्ष होत असल्याचा तसेच असा प्रकार दोन ते तीन वेळेस घडल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
कुटुंबातील ९ लोक कोविडमध्ये कार्यरत
नरेंद्रसह त्याचा भाऊ असे एकाच कुटुंबातील ९ लोक हे कोविडमध्ये नियमित सेवा देत आहेत. यातील ५ कंत्राटी तत्त्वावर तर चार कायमस्वरूपी काम करीत आहेत.
नरेंद्रच्या पश्चात त्याचा भाऊ चेतन तसेच दोन बहिणी प्रिया व पूजा आहेत. नरेंद्रच्या आई-वडिलांचे बावीस वर्षांपूर्वीच निधन झाले असून, नरेंद्र व त्याच्या बहिणीचा काका-काकूंनीच लहानपणापासून सांभाळ केला आहे. नरेंद्रच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे नातेवाइकांनी आक्रोश केला होता.
कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
नरेंद्रचा २९ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. या आधीच त्याने लॅबमधील डॉक्टरांकडे गमतीने मला यावेळी मोठे गिफ्ट द्या, असे म्हटले होते. मात्र, अचानकच मृत्यू ओढावल्याने हे नियोजन अपूर्णच राहिले. भाऊ चेतन यानेही त्याच्या वाढदिवसाचे नियोजन केले होते. दरम्यान, नरेंद्रसोबत लॅबमध्ये काम करणारे सहकारी शवविच्छेदनगृहाकडे थांबून होते. काही कर्मचाऱ्यांनी आत जाऊन नरेंद्रला मृतावस्थेत बघितल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. नरेंद्र हा कामात अगदी चोख व वेळेवर कुठलेही काम करणारा व मनमिळावू होता, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
कोट
सीएमओ डॉ. प्राची सुरतवाला यांनी तपासणी केली होती. रुग्ण मृतावस्थेतच आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. नातेवाइकांच्या मागणीनुसार या प्रकरणाची वैद्यकीय अधीक्षकांमार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. - डॉ. मारेाती पोटे, प्रभारी अधिष्ठाता