बिडगाव, ता.चोपडा , जि.जळगाव: येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेत तब्बल तीनशेवर कर्जधारक शेतकरी आहेत. दोन कोटीच्या आसपास कर्जमाफीही झाली आहे. मात्र कर्जमाफीचा सुरू असलेल्या घोळामुळे अद्यापपर्यंत येथील एकाही शेतकऱ्याला कर्जमाफ होऊन नवीन कर्ज मिळाले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.लाभ घेऊन नवीन कर्ज घ्यायचे असेल तर व्याज व विम्याची रक्कम भरा, अशी सक्ती केली जात आहे. शासनाने शेतकºयांच्या कर्जावरील व्याज भरण्याची घोषणा केली आहे. मात्र शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवत प्रत्यक्षात व्याजाची रक्कम भरल्याशिवाय नवीन कर्जच दिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे व शेतकºयांची दिशाभूल केली जात आहे.येथे एकूण २९९ कर्जधारक आहेत. त्यापैकी २० शेतकरी नोकरीला असल्याने वगळले आहेत तर ४० लाभार्थींचे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असल्याने त्यांना वरील रक्कम भरायची आहे. तेव्हा त्यांना एकूण ८५ लाखांचे हे कर्ज माफ होणार आहे. मात्र हे शेतकरी दीड लाखाच्या वरची रक्कम भरू शकत नसल्याने त्यांना नवीन कर्ज तर दूरच मात्र दीड लाखाचाही लाभही मिळू शकलेला नाही. ६३ शेतकºयांचा पती, पत्नी इतर कारणे असा मोठाच घोळ आहे. त्यांनाही योजनेचा लाभ नाही. १६२ शेतकरी दीड लाखापेक्षा कमी कर्जधारक आहेत. त्यांना तब्बल ८२लाख नऊ हजार रूपये कर्ज माफ झाले आहे. त्यांनाही कर्जमाफीपासून आतापर्यंतच्या व्याजाची रक्कम भरण्याची सक्ती केली जात आहे.शासनाने शेतकºयांच्या कर्जावरील व्याज भरण्याची घोषणा करूनही येथे व्याजाची सक्ती होत आहे. त्यामुळे शासनाची घोषणा फसवी ठरत आहे की सहकार प्रशासनाची मनमानी सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.१४ शेतकºयांना तर कर्जमाफीस पात्र असतानाही लाभच मिळाला नाही, लाभ का मिळत नाही याबाबत सचिव व एआर यांच्याकडून काहीच कारण न सांगता नावे दुरुस्तीसाठी पाठवली आहेत. एवढेच उत्तर दिले जाते.
कर्जमाफीचा घोळ मिटता मिटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:23 AM