जळगाव : मेहरूण भागातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ या संस्थेने २०२०-२१ या वर्षाची पालकांकडून कुठलीही फी न घेण्याचा निर्णय येथील संस्थाचालकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे संस्थेची विद्यालये ही विनाअनुदानित आहेत.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष शामकांत सोनवणे उपस्थित होते. कोरोना महामारीमुळे मेहरूण परिसरात आलेले संकट आणि पालकांची आर्थिक स्थिती यावर विचारविनिमय करून चर्चा झाली. यावेळी संस्थापक अध्यक्ष स्व. सुरेश मामा नाईक यांच्या आठव्या पुण्यतिथीचे औचित्य साधत अध्यक्ष व संचालक मंडळाने शालेय विद्यार्थ्यांची सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षाची १०० टक्के फी माफ केली आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी संचालक संदीप आंधळे, राजेंद्र सानप, युवराज सानप, नरेंद्र नाईक, एकनाथ वंजारी, सिंधूबाई आंधळे, अर्चना नाईक यांच्यासह मुख्याध्यापिका शीतल कोळी, वासुदेव सानप रमेश चाटे, उज्वला नन्नवरे उपस्थित होते.
कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. अशा वेळी त्यांना धीर देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संस्थेने सामाजिक जाणीव कायम ठेवून या वर्षाला कोणत्याच विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संस्थेला येणारा आर्थिक भार संचालक मंडळ स्वतः पेलणार आहे.
- प्रशांत नाईक, अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ