वैजनाथचा ठेका केला समर्पित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:14 AM2021-06-04T04:14:38+5:302021-06-04T04:14:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वैजनाथच्या वाळू ठेक्याबाबत ॲड. विजय भास्कर पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वैजनाथच्या वाळू ठेक्याबाबत ॲड. विजय भास्कर पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली होती. हा वाळू गट ठेकेदाराने पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे जमा केला आहे. तसेच सर्व वाळू गटांची मुदत आता ९ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे या वाळू गटांना पुन्हा महसूल आणि पोलीस संरक्षणात देऊन वाळू चोरी रोखण्याचा प्रशासन लवकरच प्रयत्न सुरू करणार आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली.
टाकरखेडावगळता सर्वच ठिकाणच्या ठेकेदारांनी वाळू गट जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत. ९ जून रोजी त्यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा वाळूचोरी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्कता बाळगणार आहे. या वाळू गटांना पोलीस संरक्षण देणे, पोलिसांना तैनात करणे, महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना गाड्या देणे यांसारख्या उपाययोजना केल्या जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक
दोन दिवस आधी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तीन प्रांत अधिकारी आणि पाच तहसीलदार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यात वाळू गटांची मुदत संपल्यावर वाळूचोरी रोखण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वाळू गटांच्या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच पोलीस तैनात करण्यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यात चर्चादेखील होऊ शकते.
वैजनाथची मोजणी दोन्ही गटांना अमान्य
वैजनाथ १ या वाळू गटातून जास्त उचल होत असल्याची तक्रार ॲड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. त्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने महसूल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्या नेतृत्वात मोजणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र ही मोजणी ॲड. विजय भास्कर पाटील आणि ठेकेदार श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर यांना अमान्य आहे. या ठिकाणाहून २६८ ब्रासचा अतिरिक्त वाळू साठा उचलण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.