लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरात डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयाच्या माध्यमातून काँग्रेस पदाधिकारी देत असलेल्या सेवेचा आढावा व एमडीएल लॅब आणि ऑक्सिजन टँकची उपलब्धता यातून तळागाळात आजही काँग्रेस आपली कार्य करण्याची संस्कृती जोपासल्याचा आनंद होत आहे, असे प्रतिपादन काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
प्रणिती शिंदे यांच्या हस्ते डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एनएबीएल मानांकित एमडीएल लॅबसह १३ किलोलीटर क्षमतेच्या दोन ऑक्सिजन टँकचे लोकार्पण करण्यात आले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. आमदार प्रणिती शिंदे जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकत्यांच्या भेटीसाठी आल्या होत्या, या भेटीगाठीनंतर त्यांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, महिला अध्यक्ष सुलोचना वाघ, डॉ.केतकी पाटील, धनंजय चौधरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी ऑक्सिजन टँक आणि एमडीएल लॅब, तसेच कोविड रुग्णालयातील कार्याचा धावता आढावा घेतला. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉ.वैभव पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड आदी उपस्थित होते. (वा.प्र.)