रक्षा खडसेंना ५६ तर एकनाथराव खडसे यांना ५१ टक्के पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:18 PM2018-10-12T13:18:34+5:302018-10-12T13:19:18+5:30
भाजपाच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष
मुक्ताईनगर, जि. जळगाव : २०१९ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने खाजगी सर्व्हेक्षणात आमदार-खासदारांची त्यांच्या मतदार संघातील निवडून येण्याची परिस्थिती याबाबत गोपनीय अहवाल नुकताच मुंबई येथील बैठकीप्रसंगी बंद लिफाफ्यात दिला. हा अहवाल उघड करीत यात खासदार रक्षा खडसे यांना खासदारकीसाठी तब्बल ५६ टक्के पसंती असल्याची माहिती माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली. स्वत: खडसे यांना ५१ टक्के पसंती मिळाली आहे.
भाजप कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. रावेर लोकसभा मतदार संघाचे खासदार रक्षा खडसे यांच्या खासदार तिकिटावर गदा येणार, अशा बातम्या प्रसार माध्यमातून सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती देतांना त्यानी सांगितले की, या सर्व्हेक्षणात खासदार खडसे यांच्या नावाला खासदारकीसाठी रावेर लोकसभा मतदार संघातून ५६ टक्के पसंती मिळाली आहे नमूद अहवालात ३८ टक्के लोकांनी खासदार रक्षा खडसे यांच्या कामकाजावर संतुष्ट आहेत १६ टक्के लोकांनी समाधानी असल्याचे सांगितले आणि दोन टक्के लोकांनी पुन्हा संधी द्यावी असे सांगितले आहे अशा एकूण ५६टक्के पसंती खासदार रक्षा खडसे यांना मिळाली आहे तर ३५ टक्के लोकांनी बदल पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. उर्वरित नऊ टक्के लोकांनी माहीत नाही असा पर्याय निवडला आहे, असा एकंदरीत अहवाल असल्याचे एकनाथराव खडसे यांनी सांगितले
प्रसंगी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, माजी सभापती विलास धायडे ,स्वीय सहाय्यक योगेश कोलते, माजी सरपंच प्रवीण पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य आसिफ बागवान , नगरसेवक निलेश शिरसाठ, नगरसेवक ललित महाजन आदी उपस्थित होते.
खासदार रक्षा खडसे संदर्भातील प्रसारित होणारे वृत्त जनतेची दिशाभूल करणारे आहे त्यांना शंभर पैकी माहीत नसलेला पर्याय वजा केला तर ९१ पैकी तब्बल ५६ टक्के पसंती खासदार रक्षा खडसे यांना असल्याचे तसेच मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघासाठी झालेल्या या सर्व्हेक्षणात तब्बल ५१ टक्के पसंती माझ्या नावाला आहे. सलग सातव्या वेळी माझ्या आमदारकीला पसंती मिळणे ही आपल्या कायार्ची पावती व जनतेचे प्रेम होय, अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली.