भुसावळ : शहरातील राजकारण दिवसेंदिवस वेगळे वळण घेत असून नगराध्यक्ष रमण भोळे यांना सत्ताधारी पक्षाचे भाजपचे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी घरचा अहेर देत पालिकेच्या सभेला विलंब झाल्याने बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
पालिका सर्वसाधारण सभा दर दोन महिन्यांनी घेणे नियमानुसार बंधनकारक असताना नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सहा महिने उलटूनही सभा न घेतल्याने त्यांनी कर्तव्यात कसुरी केल्याने त्यांना पदावरून पदमुक्त करावे, अशी मागणी नगरसेवक महेंद्र ठाकूर यांनी नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडे केल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली असून, राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
नगरविकास विभागाकडे नगरसेवक ठाकूर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र नगरपालिका कायदा १९६५ चे कलम ८१ (१)नुसार नगरपालिका सर्वसाधारण सभा दर दोन महिन्यांनी घेणे हे नगराध्यक्षांचे कर्तव्य आहे. तसेच कलम ५५ (अ)नुसार अशी सभा न घेतल्यास म्हणजे नगराध्यक्षांनी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांना आपल्या पदावरून हटविता येते. पालिकेची गेली सर्वसाधारण सभा २७ नोव्हेंबर २०२० रोजी झाली होती. यानंतर नगराध्यक्षांनी आजपर्यंत सर्वसाधारण सभा घेतली नाही. यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूर केली असल्याने कायद्याच्या तरतुदीचा भंग केला असून, त्यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष या पदावरून काढून पदमुक्त करावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.
पालिका निवडणूक येत्या काही महिन्यांत लागणार असून, त्या पार्श्वभूमीवर शहरात दिवसेंदिवस राजकीय वातावरण नेमके कोणत्या दिशेने जात आहे यावर चर्चा होताना दिसत आहे.
कोरोनामुळे शहराची स्थिती बिकट होती. शासनाचे अनेक निर्बंध होते. यामुळे सभा लांबली. तसेच यापूर्वी घेण्यात आलेल्या सभेमध्ये तब्बल २४१ विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. जवळपास शहरातील सर्व विकासात्मक कामांना मंजुरी मिळाली आहे. महेंद्रसिंग ठाकूर यांचे अधूनमधून असे प्रकार सुरूच असतात. लवकरच सभा होईल.
- रमण भोळे, नगराध्यक्ष, भुसावळ नगरपालिका.