सचिन देवजळगाव : लहानपणी शालेय अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची माहिती वाचायला मिळाली. तेव्हापासून शिवकालीन शस्त्रास्त्रे जमविण्याचा छंद लागला. मात्र, ही शस्त्रास्त्रे सहजासहजी मिळली नसून, यासाठी भारतातील प्रत्येक राज्यात भ्रमंती करावी लागली. तेव्हा ४० वर्षांत ही शस्त्रास्त्रे जमली आहेत. राज्य शासनातर्फे मुंबईतील समुद्रात बांधण्यात येणाऱ्या अरबी समुद्रात ही शस्त्रास्त्रे ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिवकालीन शस्त्रास्त्राचे संग्राहक गिरीश जाधव (कोल्हापूर) यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.जळगावातील ज्ञान योग वर्ग व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यानात शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधव यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला.प्रश्न : शिवकालीन शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी कुठे भ्रमंती केली?उत्तर - पुण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रास्त्रातील एक महत्वाचे शस्त्र म्हणजे ‘कट्यार’ मिळाले. तेव्हा पासून इतिहासाची पुस्तके वाचून, ही शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश,केरळ, गुजरात, ओडिशा, तामीळनाडू, कर्नाटक, गोवा व इतर राज्यांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी लढाया झाल्या आहेत. ज्या ठिकाणी मोगलांचे व राजपुतांचे साम्राज्य होते. अशा सर्व ठिकाणी जाऊन त्यांचे वंशज, गावातील जुने नागरिक तेथील अंत्यंत जुने भंगार व्यावसायिक यांच्याकडून ४० वर्षांत ही शिवकालीन शस्त्रास्त्रे जमा करता आली.प्रश्न : ही शस्त्रास्त्रे सहजपणे मिळणे अशक्य होती...?उत्तर : आज बहुतांश जणांना शिवकालीन लढाया कुठे-कुठे झाल्या, हे सांगता येईल. मात्र, शिवकालीन शस्त्रास्त्रे कुठे मिळतील, हे सांगता येणार नाही. कारण ही शस्त्रास्त्रे काही बाजारात मिळत नाहीत. ही शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी ज्या ठिकाणी लढाया झाल्या, त्या गावांतील संबंधीत घराण्याचं वंशज, गावातील जुने लोक, जुने भंगार व्यावसायिक यांच्याकडून ही शस्त्रास्त्रे खरेदी केली. तसेच अमूल्य असा ठेवा या शस्त्रास्त्रांचा असल्याने, छंदा पुढे पैशांची किंमत केली नाही.
शिवकालीन शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी भ्रमंती - गिरीश जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 1:01 PM