मुद्रांक शुल्क दस्त नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:21+5:302021-08-28T04:20:21+5:30
रावेर : कोरोनाच्या निर्बंधात काही नागरिकांनी गर्दी टाळावी म्हणून सवलतीच्या दरातील दस्त नोंदणी विहित मुदतीत केली नाही. ही बाब ...
रावेर : कोरोनाच्या निर्बंधात काही नागरिकांनी गर्दी टाळावी म्हणून सवलतीच्या दरातील दस्त नोंदणी विहित मुदतीत केली नाही. ही बाब लक्षात घेता संबंधित नागरिकांना दस्त नोंदणीसाठी आवश्यक असलेली चार महिन्यांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी केली आहे.
कोरोना काळात सुरू झालेला लॉकडाऊन व त्यामुळे थांबलेल्या व्यवहारांमुळे जनतेचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने दिलासा देत मुद्रांक शुल्कात कपात केली होती. त्या अनुषंगाने ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत देत मुद्रांक शुल्क हे ४ टक्के आकारले होते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग अद्यापही कायम असल्याने सदरची गर्दी दूर करणे गरजेचे असल्याने शासनाने नागरिकांनी खरेदी करावयाच्या मालमत्तेचे मुद्रांक शुल्क हे ३१ मार्चपर्यंत भरल्यास त्यांना सवलतीच्या दरात म्हणजेच ४ टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागेल. मात्र गर्दी न करता ते नागरिक पुढील ४ महिन्यांपर्यंत केंव्हाही दस्त नोंदणी करू शकतात, असा निर्णय घोषित केला होता.
मात्र कोरोनाचा संसर्ग अद्यापही कायम असल्याने काही नागरिकांनी गर्दी टाळावी म्हणून दस्त नोंदणी त्या विहित चार महिन्यांच्या मुदतीत केलेली नाही. अशा नागरिकांना दस्त नोंदणीसाठी असलेली चार महिन्यांची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरून आहे.
मात्र दुय्यम निबंधक कार्यालयात व जिल्हा निबंधक कार्यालयाकडे यासंदर्भात मागणी केली असता, मुदतवाढ देण्यात येणार नसून उलटपक्षी भला मोठा दंड आकारला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कोरोना काळात आधीच व्यवसाय / रोजगार बंद असणाऱ्या नागरिकांचे मात्र मोठे नुकसान होत आहे व शासनाच्या या धोरणाबाबत संताप व्यक्त होत आहे. तरी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन शासनाने अशा दस्त नोंदणीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, मुख्य सचिव, महसूल सचिव, जिल्हाधिकारी, जळगाव व मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव यांनाही पाठविल्या आहेत.