पहिल्या लॉकडाऊनपासून बंद असलेल्या या पॅसेंजरमुळे चाळीसगाव व धुळे येथे ये-जा करणाऱ्या व्यावसायिक, मजूर,कामगार या सर्वांना पर्यायी दुसऱ्या साधनाने तडजोड करावी लागत आहे आणि ते फारच खर्चिक आहे. धुळे-चाळीसगाव मार्गावर एकही एक्स्प्रेस अथवा पॅसेंजर सुरू नाही तर पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ मार्गावर काही एक्स्प्रेस सुरू असून येथे मात्र अद्याप एकही पॅसेंजर सुरू नसल्याने, गरीब प्रवाशांची परवड होत आहे.
गोरगरीब, मध्यमवर्गीयांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी व सुरक्षित प्रवास म्हणून या रेल्वे वाहतुकीकडे पाहिले जाते. या मार्गाने हजारो प्रवासी दररोज जा-ये करीत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनलॉकची प्रकिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खान्देशची जीवनवाहिनी असलेली ही पॅसेंजर सुरू करण्यासाठी आपण लक्ष घालण्याची मागणीही पल्लण यांनी केली आहे. याबाबत रेल्वेमंत्री व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे.