सलून सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:38+5:302021-06-04T04:13:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या प्रश्नांचा विचार करून सलून आणि पार्लर सुरू करण्याची मागणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या प्रश्नांचा विचार करून सलून आणि पार्लर सुरू करण्याची मागणी जिल्हा सलून आणि पार्लर असोसिएशनने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, २० मार्चपासून नाभिक व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे आता अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांनी व्यवसायासाठी कर्ज देखील घेतले आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांसमोर आर्थिक गरजा कशा पूर्ण कराव्यात, हा प्रश्न उभा ठाकला आहे. या व्यावसायिकांचे बँकांच्या कर्जाचे हप्ते सुरू आहेत. तसेच वीज मीटरचे बिलदेखील त्यांना भरावे लागत आहे. काहींचे दुकान हे भाडेतत्त्वावर घेतले आहे. त्यांचे दुकानभाडे सुरू आहे. त्यामुळे नाभिक समाजाची कोंडी झाली आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. त्यामुळे नियमावली तयार करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगार उपस्थित होते.