जळगाव : भारतीय बीज निगम, जळगाव यांच्याकडे धैंचा बियाणे व सन बियाणे उपलब्ध असून, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, धैंचापासून प्रति एकर ८० क्विंटल हिरवळीचे खत मिळते, जे एकरी २२४ क्विंटल शेणखत एवढा फायदा देते. केळी पिकात अंतरपीक म्हणून लागवड करून केळीस हिरवळीचे खत उपलब्ध करून देता येऊ शकते, अधिक माहिती साठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले आहे.
------
भुसावळ विभागातून ८६ कर्मचारी सेवानिवृत्त
जळगाव : भुसावळ रेल्वे विभागातून ३१ रोजी जळगाव,चाळीसगाव, मनमाड यासह विविध स्टेशनरील ८६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शन केले. तसेच या कर्मचाऱ्यांचा स्थानिक रेल्वे स्टेशन प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला रेल्वेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
------
रेल्वे स्टेशनच परिसर पुन्हा गजबजला
जळगाव : लॉकडाऊनमुळे महिना भरापासून उद्योग-व्यवसाय बंद असल्यामुळे, रेल्वे स्टेशनसमोरही विविध प्रकारचा व्यवसाय करणाऱ्यांची दुकाने बंद होती. मात्र, मंगळवार पासून पुन्हा बाजारपेठा उघडण्याचे आदेश दिल्याने, रेल्वे स्टेशन समोरीलही सर्व दुकाने उघडली आहेत. यामुळे नेहमीप्रमाणे सकाळपासूनच हा परिसर गर्दीने गजबजून जात आहे.