संगणक परिचालक मानधनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:24+5:302021-05-31T04:13:24+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानांतर्गत मागील वर्षाच्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांकडून ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानांतर्गत मागील वर्षाच्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांकडून गावातील अंगणवाडीबाबतची विविध घटकांवरील माहिती जमा करून ती ऑनलाइन माहिती मिशन अंत्योदय या पोर्टलमध्ये भरण्याचे कामे करून घेतले. त्याचप्रमाणे संगणक परिचालकांनी भारत सरकारच्या ग्रामविकास विभागामार्फत मूलभूत गरजांच्या पुरवठ्यासंदर्भातील सर्वेक्षणात प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाच्या दारोदारी जाऊन सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगणनेनुसार वंचित आणि जोखीमप्रवण म्हणून गेलेल्या कुटुंबाच्या राहणीमानातील बदल जाणून घेण्यासाठी विविध संदर्भातील साधारण प्रश्न जाणून घेऊन त्याची सविस्तर माहिती ऑनलाइन भरण्यात आली होती.
सर्वेक्षण काळात कोरोनाच्या पहिल्या लाटेने धुमाकूळ घातला होता. अशा जीवघेण्या परिस्थितीत संगणक परिचालकांनी आपला जीव मुठीत घेऊन प्रामाणिकपणे मिशन अंत्योदय व ईओएल सर्वेक्षणाची जबाबदारी पार पाडली. मात्र त्याचे मिळणारे तुटपुंजे मानधन सहा महिने उलटूनही न मिळाल्याने संगणक परिचालक चिंतित आहे. मानधन देण्याची जबाबदारी ही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची असून जिल्हास्तरावर कोविडच्या परिस्थितीमुळे निधी प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन मीटिंगमध्ये ५ जूनपर्यंत जिल्हास्तरावर निधी येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वेक्षण करून सहा महिने होऊनही मानधन मिळालेले नाही, तरी संगणक परिचालक शांत आहेत. जर येणाऱ्या पंधरा दिवसांत मिशन अंत्योदय व ईओएल सर्वेक्षणाचे मानधन प्राप्त न झाल्यास आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा पवित्रा संगणक परिचालकांनी घेतला आहे.