कोरोनाविरुद्धच्या लढाईत बलिदान देणाऱ्या महान आत्मांचे भरले ‘डेरगं’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 09:19 PM2020-04-26T21:19:51+5:302020-04-26T21:21:47+5:30
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाचे बलिदान देणाºया महान आत्म्यांचे अक्षय तृतीयेच्या दिवशी डेरगं भरून आदरांजली वाहण्यात आली.
रावसाहेब भोसले
पारोळा, जि.जळगाव : कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाचे बलिदान देणाºया महान आत्म्यांचे अक्षय तृतीयेच्या दिवशी डेरगं भरून आदरांजली वाहण्यात आली. पारोळा तालुक्यातील शिक्षकाने हा उपक्रम राबविला.
अक्षय तृतीयेचा उर्फ आखाजी हा सण खान्देशात विशेष करून मोठ्या प्रमाणात आनंद व उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी परिवारातील मृत व्यक्तीच्या आत्मशांती व मोक्ष प्राप्तीसाठी मातीची नवीन घागर भरली जाते. लोटा व पंचामृतसाठी छोटी बोळकी घरी आणून पूजा करून परिवारातील सदस्य व जवळचे भाऊबंद त्यात पवित्र जल टाकून त्या आत्माच्या शांतीसाठी प्रार्थना करतात. नंतर घरात त्या दिवशी केलेले अन्नपदार्थ, पंचामृत, शुद्ध तुप हे प्रज्वलित अग्नीत अर्पण करून तर्पण करतात. त्यास आगारी किंवा घास टाकणे म्हणतात. तसेच हयात व्यक्तीला आयुष्य, आरोग्य व धन मिळावे यासाठीही प्रार्थना केली जाते.
आपण हा विधी आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तीसाठी तर करतोच पण जि. प. प्राथमिक शाळा धाबे, ता.पारोळा येथील मुख्याध्यापक मनवंत साळुंखे व त्यांच्या पत्नी चित्रा पाटील यांनी संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणुकीनुसार ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत कोरोना या महाभयंकर आजाराशी लढताना लाखो लोकांचे जीव वाचविण्यासाठी काही महान डॉक्टर, परिचारिका, पोलीस व सफाई कर्मचारी यांनी जीवाचे बलिदान दिले. तसेच अनेक निरपराध नागरिक कोरोना आजाराचे बळी ठरले. खान्देशातील धार्मिक परंपरेनुसार या दाम्प्याने मृत आत्मांची शांती व मोक्षप्राप्तीसाठी डेरगं भरून त्यांना आदरांजली वाहिली. तसेच पवित्र अग्नीत त्यांचे स्मरण करून आगारीही टाकली.
याप्रसंगी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पुना पाटील व युवा सामाजिक कार्यकर्ता प्रदीप जगन्नाथ पाटील यांनीही या धार्मिकप्रसंगी उपस्थित राहून पवित्र जलअर्पण करून पूजन केले. घास टाकला.