लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या कार्यकाळात शहरातील महात्मा गांधी व भाऊंचे उद्यान हे जैन उद्योग समूहाच्या सहयोगातून विकसित करण्यात आले होते. आता महापालिकेत पुन्हा सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता आल्यानंतर, शिवसेनेने लोकसहभागातून शहरातील कामांना प्राधान्य देण्याचे नियोजन केले असून, लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात महापालिका पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. त्यात राज्य शासनाकडूनदेखील निधीची कमतरता असल्याने शहरातील विकासकामांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला जाणवतो. यामुळे तत्कालीन खाविआच्या काळात शहरातील अनेक विकासकामे ही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून म्हणजेच लोकसहभागातून करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले होते. यात महात्मा गांधी व भाऊंचे उद्यान हे जैन उद्योग समुहाच्या माध्यमातून विकसित करण्यात आले. सद्यस्थितीत या दोन्ही उद्यानात नागरिकांची मोठ्या प्रमाणात सातत्याने गर्दी असते. त्यावेळेस शहरातील काव्यरत्नावली चौक व डी मार्ट चौक हे दोन्ही चौक विकासित करण्याबाबत जैन उद्योग समुहासोबत चर्चा झाली होती. मात्र, महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपाची सत्ता आल्यानंतर या कामांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र, पुन्हा शिवसेनेची सत्ता महापालिकेत आल्यामुळे थांबलेल्या कामांना लोकसहभागातून पुन्हा प्राधान्य देण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
काव्यरत्नावली चौकात होणार कृत्रिम बेट, रामदास कॉलनीतील उद्यानही होणार विकसित
तत्कालीन महापौर नितीन लढ्ढा यांच्या काळात काव्यरत्नावली चौकातील जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या शासकीय निवासस्थानी लागून असलेले महापालिकेच्या जागेवर कृत्रिम बेट तयार करून, या चौकाचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. जैन उद्योग समुहानेदेखील या प्रस्तावाला मंजुरी देत हा चौक सुशोभिकरण करण्याबाबत होकार दर्शवला होता. यासह डी मार्ट परिसरातील चौकाचेदेखील सुशोभिकरण करण्याचे काम रखडले होते. आता हे अपूर्ण काम व काव्यरत्नावली चौकात कृत्रिम बेटाचे काम जैन उद्योग समुहाच्या मार्फत लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी ''लोकमतला'' दिली. यासह रामदास कॉलनीमधील उद्यानदेखील पिपल्स बँकेच्या माध्यमातून श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान विकसित करण्याबाबत केशव स्मृती प्रतिष्ठानला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर हे उद्यानदेखील विकसित करण्यात येणार आहे.
स्वच्छतागृहांचीही लवकरच होणार उभारणी
शहरात महापालिकेकडून स्वच्छतागृह उभारण्यात आलेले नसल्याने नागरिकांना मुख्य बाजारपेठ परिसरात मोठा त्रास सहन करावा लागतो. मध्यंतरी टॉवर चौक परिसरात सुप्रीम इंडस्ट्रीजतर्फे स्वच्छतागृह तयार करण्यात आलेले होते. आता पुन्हा शिवसेनेकडून सुप्रीम इंडस्ट्रीला सागर पार्क व रामदास पार्क येथे स्वच्छतागृह उभारण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला होता. सुप्रीम इंडस्ट्रीने या प्रस्तावाला होकार दिला असून, आठ दिवसात या कामांनादेखील सुरुवात होणार आहे. लोकसहभागातून होणाऱ्या कामांमुळे शहरातील नागरिकांच्या अनेक अडचणी दूर होतात. महापालिका प्रशासनालादेखील काही प्रमाणात दिलासा मिळून आपल्याकडील निधीचा वापर इतर ठिकाणी करता येऊ शकतो.
कोट..
महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, शहरातील उद्यानांचा विकास किंवा चौक सुशोभिकरण ही कामे महापालिकेकडून करणे, सद्यस्थितीत शक्य नाही. अनेक सामाजिक संस्था मात्र यासाठी पुढाकार घेण्यास तयार आहेत. यामुळे लोकसहभागातून जी कामे शहरासाठी शक्य आहेत ती कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे व अनेक कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.
- नितीन लढ्ढा, माजी महापौर