शरद बन्सीधरणगाव, जि.जळगाव : शहरासह तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून, दि. २१ रोजी ३९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हजारी पार जाऊन १,०३२ झाली आहे. तालुका हजारी पार झाल्याने प्रशासनाचा ताण वाढला आहे. आता तरी शहरी भागासह ग्रामीण भागातील जनतेने कोरोना महामारीकडे गांभीर्याने पाहावे. आपली, परिवाराची, गावाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीन देवरे यांनी केले आहे.धरणगाव तालुक्यात दि.२१ रोजी ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यात ग्रामीण भागात पाळधी खुर्द १०, पाळधी बुद्रूक २, बोरगाव ३, झुरखेडा ६ , रोटवद ३, तर निमखेडा, चमगाव, पिंपळे, पथराड, बिलखेडा, हिंगोणे या गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण तर धरणगाव शहरातील मराठे गल्ली २, पेंढारे गल्ली, वाणी गल्ली, खत्री गल्ली, पातालनगरी, गुजराथी गल्ली, अ.मा.वाडा, जी.एस.नगर या परिसरात प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १०३२ झाली आहे. पैकी ३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७९३ रुग्णांची बरे होऊन घर वापसी झाली आहे. हल्ली २०२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दिली.प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीन देवरे, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.गिरीश चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय सोनवणे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, सपोनि पवन देसले, मुख्याधिकारी जनार्दन पवार, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, कोतवाल तबरेज शेख यांनी कंटेन्मेंट झोन परिसरात बाधितांचा परिसरात सील केले. रोजची वाढणारी रुग्णसंख्या पाहता खबरदारीची उपाययोजना करून नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. सोशल डिस्टसिंग पाळावे, गर्दीचे कार्यक्रम टाळावे, असे आवाहन करीत आहे. मात्र जनता प्रशासनाच्या आवाहनाकडे गांभिर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.