धरणगाव, जि.जळगाव : येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी ११ रोजी आठ उमेदवारांचे १२ अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत १२ रोजी आहे.नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक येत्या २९ डिसेंबर रोजी होत आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत १२ डिसेंबरपर्यंत आहे. यामुळे अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.११ रोजी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव रतन वाघ (शिवसेना), माजी नगराध्यक्षा उषा गुलाबराव वाघ (शिवसेना), शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र किसन महाजन (शिवसेना), हाजी शेख इब्राहीम अब्दुल रसूल (राष्ट्रवादी व अपक्ष ), संभाजी गोविंदा धनगर (राष्ट्रवादी व अपक्ष), नीलेश भागवत चोधरी (राष्ट्रवादी व अपक्ष), ललित बाळकृष्ण येवले (भाजप व अपक्ष), संजय एकनाथ माळी (अपक्ष) याप्रमाणे अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी, सहाय्यक मुख्याधिकारी जनार्दन पवार, संजय मिसर यांनी दिली. आता शेवटच्या दिवशी किती उमेदवारांचे अर्ज दाखल होतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. आजपावेतो १२ उमेदवारांनी १९ अर्ज दाखल केले आहे.गेल्या वेळेस नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे अत्यल्प मतांनी पराभूत झालेले उमेदवार तथा भाजपचे तालुकाध्यक्ष संजय छगन महाजन हे प्रमुख दावेदार असताना ते उमेदवारी दाखल करणार नसल्याचे समजते. ते उमेदवारी दाखल करण्यास इच्छूक नाहीत की पक्षातंर्गत काही अडचण त्यांना आली नाही याविषयी शहरात चर्चा सुरू आहे. ते उमेदवारी दाखल करतील का हे गुरुवारीच स्पष्ट होणारच आहे. तसेच शिवसेनेचे नीलेश चौधरी, गुलाबराव वाघ, उषा वाघ, राजेंद्र महाजन यांच्यानंतर कोण उमेदवारी दाखल करतात याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे.
धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी आठ उमेदवारांचे १२ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 10:23 PM