धुळ्याच्या झेड.बी. पाटील महाविद्यालयाने जिंकली जकातदार स्मृतीकरंडक विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 07:12 PM2019-02-12T19:12:18+5:302019-02-12T19:13:22+5:30
भडगाव येथील रजनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मधुकर सदाशिव जकातदार व वत्सलाबाई मधुकर जकातदार स्मृतीकरंडक विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. ‘जातीनिहाय आरक्षण ही समाजाची गरज आहे.’ या ज्वलंत विषयावरील या स्पर्धेचे विजेतेपद व फिरता चषक धुळे येथील झेड.बी.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या चमूने पटकावला.
भडगाव, जि.जळगाव : येथील रजनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मधुकर सदाशिव जकातदार व वत्सलाबाई मधुकर जकातदार स्मृतीकरंडक विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. ‘जातीनिहाय आरक्षण ही समाजाची गरज आहे.’ या ज्वलंत विषयावरील या स्पर्धेचे विजेतेपद व फिरता चषक धुळे येथील झेड.बी.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या चमूने पटकावला.
सामाजिक कार्यकर्ते व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक विनय मधुकर जकातदार यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपयाचे बक्षीस धुळे येथील झेड.बी.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रसाद देवीदास जगताप याने जिंकले, तर याच महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर गोपाळराव शितोळे याने दोन हजार रुपयांचे तृतीय बक्षीस मिळवले.
भुसावळ येथील पी.ओ.नाहटा महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंजली संग्राम पाटील हिने तीन हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. बी.पी.आर्ट्स महाविद्यालय, चाळीसगाव येथील सागर हनुमंत बोरसे व नहाटा महाविद्यालय, भुसावळ येथील हर्षल संजय भांडारकर यांनी पाचशे रुपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे पटकावली.
स्पर्धेचे उद्घाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक बबनराव देशमुख यांच्याहस्ते, संचालक विजयराव देशपांडे व विनय जकातदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
पारितोषिक वितरण समारंभ पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्याहस्ते, भोला चौधरी, विनय जकातदार, विजय देशपांडे व प्राचार्य डॉ.एन.एन.गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला.
संस्थेचे संचालक खलील देशमुख, सुनंदा जकातदार व माजी मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. डॉ.बी.एस.भालेराव यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. डॉ.सी.एस.पाटील व प्रा.जी.एस.अहीरराव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डी.ए.मस्की, डॉ.सचिन हडोळतीकर, प्रा.आर.एम.गजभिये, प्रा.श्रावण कोळी, प्रा.जे.जे.देवरे, प्रा.स्वप्नील भोसले, प्राध्यापकांंनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.