धुतरुम एक आनंद आणि बरंच काही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:24 PM2019-12-31T23:24:10+5:302019-12-31T23:25:18+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात लिहिताहेत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा.ना. आंधळे...
प्रमाण भाषा असो वा बोलीभाषा तिच्याठायी सौंदर्याची कुपी ही असतेच असते. मुळातच सुंदर असलेली ही भाषा नेटकं बोलणाऱ्याकडून अधिक सुुंदर होत जाते. कधी-कधी तर साधा एक शब्दसुद्धा भाराभार बोलण्याची गरजही भासू देत नाही. अशावेळी भाषिक सौंदर्यासोबत भाषिक सामर्थ्याचेही दर्शन घडून जाते. या सबंध पृच्छेचे कारणही मोठे मजेदार आहे. त्याचे हे सूतोवाच.
काही महिन्यांपूर्वी एका वरिष्ठ महाविद्यालयात वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून परीक्षा घेण्यासाठी गेलो असतानाचा हा प्रस्तूत प्रसंग. त्या प्रसंगात तिथल्या एका कारकुनाने उच्चारलेला ‘धुतरूम’हा शब्द मला आनंद देत लिहितं करून गेला. संबंधित महाविद्यालयाचे ते लिपिक तावातावाने ‘तुझे हे धुतरूम अजिबात चालणार नाही’ असे एका विद्यार्थ्यास बोलून गेले. त्यांच्या या उच्चारासरशी माझ्या कानापासून मनापर्यंत आणि मनापासून नखशिखांत सुखसंवेदना अक्षरश: पाझरल्या. त्याचं कारण ‘धुतरूम’ हा शब्द माझ्या घरात आजी-आजोबाकडून कधी गल्लीतल्या घरांमधून तर कधी खेळ खेळताना सवंगड्याकडून पण आताशा हाच शब्द अडगळीत पडल्यामुळे त्याचे अकस्मात झालेले उच्चारागमन मला मात्र आनंद देऊन गेले, एवढे मात्र खरे.
बालपणी शब्दांभोवती तितकंसं न रमणारं मन मोठेपणी अध्यापन क्षेत्रात आल्यामुळे म्हणा वा सृजनांची देणगी मिळाल्यामुळे म्हणा शब्दांभोवती रुंजी घालायला लागतं. त्याचाच परिणाम म्हणून ‘धुतरूम’ या शब्दाच्या निर्मितीच्या जिज्ञासेपासून तर या शब्दाठायी असलेल्या नानाविध अर्थछटा मनात तरळू लागल्या. ‘धुतरूम’ हे विशेषण आहे की क्रिया विशेषण या व्याकरणिक-अंगापासून यास कोणत्या भाषिक अलंकारात बसवावे येथपर्यंत माझे मन गिरक्या व घिरट्या घालू लागले. तोच तेच सद्गृहस्थ माझ्याजवळ येत त्याच शब्दाचा पुनरूच्चार करीत वदले. ‘काय करावं सर, सध्या विद्यार्थ्यांचे धुतरूम वाढलेहेत.’ यावेळी मात्र माझी उत्सुकता ‘धुतरूम’ या शब्दाच्या नेमक्या अर्थासाठी अधीर झाली; अन् त्यांनाच विचारता झालो, ‘भाऊसाहेब धुतरूम म्हणजे काय हो?’ त्यांनी माझ्या या प्रश्नावर हास्यकटाक्ष टाकीत ‘काय मजा घेता मराठीचे अभ्यासक’ असे म्हणत माझ्या प्रश्नाची बोळवणच केली. माझा हट्ट कायम असल्याचे पाहून भाऊसाहेबांनी ‘धुतरूम’ या शब्दाचा अर्थ रिकामी कामं’ असे सांगून माझे समाधान केले. पण या शब्दार्थाने माझे समाधान मात्र झाले नाही. परीक्षेचे कामकाज यथोचित आटोपून घराकडे परतताना या शब्दानं विविध अर्थाछटांसह मनात थैमानच घातलं; अन् बोलीभाषेचं सौंदर्य किती व्यापक आणि वर्धिष्णू असतं या विचारानं आनंदात भरच पडली.
बालपणी यात्रेतून खेळणं घेऊन दिलं नाही म्हणून घरी येऊन मी केलेली आदळआपट पाहून ‘असे धुतरमं करू नको’ असे आजी म्हणाली. त्यावेळी ‘असे नाटकं करू नको’ हा अर्थ आजीला अभिप्रेत होता. खेळ खेळताना कुणी रडीचा डाव खेळायला लागला तर हे धुतरूम चालणार नाही म्हणजे जिवावर येणं चालणार नाही. हा अर्थ आज उमगला. दारू पिऊन येणाºया नवºयाला ‘तुमच्या या धुतरूमाचा कंटाळा आलाय’ असं म्हणणाºया बाईला दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा कंटाळा आल्याचे आज समजते. काही काम करायचे नसल्यास ‘तुझे धुतरमं मला चांगलेच ठाऊक आहेत? म्हणजे कारणं ठाऊक आहेत. याचाही आज रोजी मला शोध लागला.
थोडक्यात काय, एकच शब्द वेगवेगळ्या प्रसंगाचे वर्णन सौष्ठवासह अर्थसौष्ठत्वातही कशी भर घालतो याचा प्रत्यय माझ्यातल्या शिक्षकाला मात्र यानिमित्ताने आला. अन् माझ्यातला कवी यानिमित्ताने बालपणातल्या भूतकाळातच हळूच शिरू लागला. अडगळीत गेलेल्या इतर दुसºया शब्दांसाठी तेव्हा तुम्ही माझ्या या वेडेपणाला धुतरूम म्हटला तरी माझी काही एक हरकत नाही. उलट आनंदच आहे.
-प्रा.वा.ना. आंधळे, धरणगाव, जि.जळगाव