कर्जमाफीचे व्याज बँकांना भरायला सांगणाऱ्या सरकारचे डोके फिरले का?, खडसेंचा सरकारला घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 06:31 AM2019-08-20T06:31:38+5:302019-08-20T06:31:52+5:30
जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. खडसे म्हणाले की, कर्जमाफीच्या निर्णयात सरकारने सतत बदल केले. अजूनही सुस्पष्टता नाही.
जळगाव: सरकारने कर्जमाफीबाबत वेगवेगळे निर्णय घेतले. त्यातील बरेच निर्णय हे सभासदांना तसेच मलाही रूचणारे नाहीत. कर्जमाफी शासनाने करायची अन् व्याजाचा भुर्दंड बँकांना भरायला सांगणाºया सरकारचे डोके फिरले काय? असा घरचा अहेर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे दिला.
जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. खडसे म्हणाले की, कर्जमाफीच्या निर्णयात सरकारने सतत बदल केले. अजूनही सुस्पष्टता नाही. कर्जमाफी झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रक्कमेवरचे व्याजच ७० ते ७५ कोटी झाले आहे. मात्र शेतकºयांना या व्याजाचा भुर्दंड पडणार नाही. बँकांनी ते व्याज भरावे, असा निर्णय शासनाने घेतला. याबाबत सरकारकडे बँकांची बाजू मांडूनही उपयोग झाला नाही. नाबार्डनेही सुचविले यात मार्ग काढा, नाही तर राज्यभरातील कर्ज बंद करून टाकू. शासनाच्या या निर्णयाविरोधात व्याज सरकारनेच भरावे, अशी मागणी करीत फक्त आपण औरंगाबाद खंडपीठात गेलो. सरकारविरोधात याचिका दाखल केली. सत्ताधारी पक्षातील आमदारालाच सरकारविरोधात कोर्टात जावे लागते, यापेक्षा दुर्देव काय? अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या सभेत मांडणार विषय
मुख्यमंत्री फडणवीस हे या आठवड्यात जिल्ह्यात दौºयावर येत आहेत. बँकेच्या कार्यकारी संचालकांना सोबत घेऊन त्यांची भेट घेऊन हा विषय मांडू. जर भेट शक्य झाली नाही तर जाहीर सभेतील भाषणात हा विषय मांडू , असेही त्यांनी सांगितले.