ममुराबाद : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आलेले एक खासगी टँकर जळगावहून चोपडा शहराकडे जात असताना त्याची डिझेल टाकी अचानकपणे तुटून रस्त्यावर पडल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. हे टँकर माजी खासदार वसंतराव मोरे यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले.
चोपडा येथील चिलिंग सेंटरवर दूध घेण्यासाठी नियमितपणे जाणारे टँकर (क्र. एमएच ४४, ५१०) शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे जळगावाहून निघाले होते. टँकर भरधाव असताना ममुराबाद येथील बसस्थानकालगत सुमारे साडेतीनशे लिटर क्षमतेची डिझेल टाकी वेल्डिंग तुटल्यामुळे किंवा नटबोल्ट निघाल्याने लटकताना दिसून आली. साधारण दोनशे मीटरपर्यंत डिझेलने फुल्ल भरलेली टाकी फरफटत गेल्यानंतर तुटून रस्त्याच्या कडेला खाली जाऊन पडली. रात्रीची वेळ असल्याने चालक विनोद सपकाळे यांच्या लक्षात आले नाही. इंजिनच्या पंपात डिझेल असेपर्यंत टँकर धावत राहिला. ममुराबादपासून एक किलोमीटर अंतरावर लाकडाच्या वखारजवळ टँकर बंद पडला. दरम्यान, डिझेलची टाकी रस्त्यावर घासली जात असताना दोनशे मीटर अंतरापर्यंत मोठ्या ठिणग्या उडत होत्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रात्रीची वेळ असल्याने टाकी तुटून पडल्यानंतर दुसरे एखादे वाहन आले नाही आणि टाकीचाही स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठा अपघात टळला.
------------------
(फोटो- २०सीटीआर ८५)
ममुराबाद येथे शुक्रवारी रात्री दूध संघाच्या धावत्या टँकरची डिझेल टाकी तुटून रस्त्याच्या कडेला पडली.