लोकमत न्यूज नेटवर्क,
धरणगाव : पंढरपूरचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात यावे. दिंडीला परवानगी मिळावी, यासाठी तालुक्यातील कीर्तनकार, टाळकरी वारकरी तसेच
तालुक्यातील भाजपवतीने दिंडी काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी अटकेत ठेवलेले आहेत. त्यांना त्वरित मुक्त करण्यात यावे. यासाठी धरणगाव तहसीलदार
नितीन कुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ यांना निवेदन देण्यात आले. माऊली वारकरी शिक्षण संस्था येथून टाळमृदंगाच्या गजरात गावातून दिंडी काढण्यात आली. भजन टाळ, मृदंग यांचा गजर करत तहसील कार्यालयाला ही दिंडी आली. आध्यात्मिक वातावरणाने संपूर्ण तहसील परिसर दणाणून गेला.
वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी धोतर, टोपी व पांढरा सदरा आशा वारकरी पोषाखात होते. पुढे दोन भगवे झेंडे, मृदंग वादक, टाळकरी रांगेने भजन, अभंग
म्हणत होते. हे दृश्य संपूर्ण गावात आकर्षणाचा विषय ठरला.
यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महामंडलेश्वर भगवानदास महाराज, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सागर महाराज भवरखेडेकर, एकनाथ महाराज
निमझेरिकर, रमेश महाराज, दयाराम महाराज, अण्णा महाराज, उदय महाराज, दीपक महाराज तसेच भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय महाजन,
तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, उपाध्यक्ष सुनील
चौधरी, नगरसेवक गुलाबराव मराठे, कडूसिंग बयस आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : धरणगाव येथे प्रथमेश मोहोळ यांना निवेदन देताना महामंडलेश्वर भगवानदास महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सागर महाराज, संजय महाजन,
जिजाबराव पाटील आदी छाया : आर.डी. महाजन.