"मैं बेरोजगार हो गया हूँ", चिठ्ठी लिहून इसमाची अमळनेरमध्ये आत्महत्या
By संजय पाटील | Published: September 15, 2022 11:20 AM2022-09-15T11:20:22+5:302022-09-15T11:20:48+5:30
ही घटना बुधवारी रात्री आठ वाजता सिंधी हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली.
अमळनेर : माझ्या मुलाचे दोन वर्षाचे शिक्षण बाकी आहे, माझ्या मित्रानो आपण शक्य तेवढी मदत करावी, अशा भावनिक शब्दात चिठ्ठी लिहून बेरोजगार सिंधी इसमाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पैशाचा तगादा लावणाऱ्या दोन जणांची नावे देखील त्याने चिट्ठीत लिहिल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजता सिंधी हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली.
दिनेश ठाकूरदास पंजवाणी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. तर जितेंद्र चौधरी (पारोळा) व रुग्णवाहिका चालक महेश सैंदाणे (रा. जानवे ता.अमळनेर) अशी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे आहेत. दिनेश पंजवाणी याने लिहिलेल्या चिट्ठीतील मजकूर असा "मैं दिनेश पंजवाणी अपने होश आवास मे लिख रहा हूँ. मैं बेरोजगार हो गया हूँ, मुझे कोई काम नही मिल रहा है और शर्म की बात है की मेरी बीबी काम करके घर चलायेगी, मुझे दो लोग पैसे के लिये बहोत तंग कर रहे है...जितू चौधरी महेश सैंदाणे ये लोग मुझे धमकी दे रहे है और मेरे पास घर चलानेको पैसे नही है ,ये दोनो को कहासे दु ,इसलिए तंग होकर मैं आत्महत्या कर रहा हूँ. ये दोनो के मोबाईल नंबर मेरे मोबाईल मे है...."
याचबरोबर, सुसाईड नोटच्या खाली मेरे जीएस ग्रुप के दोस्तो के लिए...माझे सर्व चड्डी मित्र आपल्याला माझी शेवटची कळकळीची विनंती आहे की, माझा मुलगा वरुण याचे दोन वर्षाचे शिक्षण बाकी आहे. तरी आपल्या ग्रुपकडून शक्य तेवढी मदत करावी, असा उल्लेख त्यात आहे. दरम्यान, दिनेशच्या काकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.