लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कौटुंबिक वादातून दिराने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत तिची अमानुषपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता शहरातील पिंप्राळा उपनगर परिसरातील मयूर कॉलनीत घडली. योगिता मुकेश सोनार (वय ३९) असे हत्या झालेल्या महिलेचे तर दीपक लोटन सोनार (वय ३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, मृत महिलेच्या मुलासमोर ही घटना झाल्याने त्याने पोलिसांना ही घटना सांगितली.
काय आहे नेमकी घटना?
मयत योगिता सोनार या मयूर कॉलनीत सासू प्रमिला, दीर दीपक आणि मुलगा आर्यन यांच्यासह राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश लोटन सोनार यांचे यावल येथे अपघाती निधन झाले होते. मुकेश यांच्या निधनानंतर १६ दिवसांनी त्यांचे वडील लोटन सोनार यांचेही हृदयविकाराने निधन झाले होते. दरम्यान, त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. शुक्रवारी जेवण झाल्यानंतर दीपक हा घरात भावाच्या काही फाईल्स बघत होता. तितक्यात त्याचा व वहिनीचा वाद झाला अन् संतापलेल्या दीपकने पलंगामागील कुऱ्हाड काढून वहिनी योगिता यांच्या डोक्यात घाव घातले. यात योगिता यांचा दारात मृत्यू झाला.
रस्त्यावर कुऱ्हाड घेऊन फिरत होता मारेकरी...
वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाड मारल्यानंतर दीपक हा घराबाहेर आला. नंतर तो कुऱ्हाड घेऊन रस्यावर फिरत होता. ही घटना एलसीबीचे प्रीतमसिंग पाटील व तुषार जोशी यांना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना दीपक हा कुऱ्हाड घेऊन फिरताना दिसून आल्यानंतर त्यांनी त्याला पकडले. नंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
दरवाजात रक्ताचा सडा
कुऱ्हाड मारल्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी अक्षरश: रक्ताचा सडा पडलेला होता. तर काही अंतरावर कुऱ्हाड पडून होती. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर हे घटनास्थळी दाखल झाले. अपर पोलीस अधीक्षक चद्रकांत गवळी यांनीदेखील घटनास्थळी येऊन पाहणी केली.
माझी आई जिवंत आहे ना...
मुलगा आर्यन हा घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्यामुळे अपर पोलीस अधीक्षकांनी त्यास घटनाक्रम जाणून घेण्यासाठी बोलविले. त्यावेळी भेदरलेल्या आर्यनने त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. यात आर्यनने आपल्या काकाने वाद झाल्यानंतर पलंगामागून कुऱ्हाड काढून आईच्या डोक्यात मारली. त्यानंतर आपण पाच जणांचा खून करणार आहे, हा एक झाला असून मला पोलीस काही करू शकत नाही, असे बोलल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. माझी आई जिवंत आहे ना अशी विचारणा तो वारंवार पोलिसांना करीत होता.
दीपकला पोलिसांनी केली अटक
पोलिसांनी आरोपी दीपक याला अटक केली आहे. सुनेच्या खुनानंतर सासू प्रमिला या सुन्न झाल्या होत्या. रात्री पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत कुऱ्हाड ताब्यात घेतली. फॉरेन्सिक लॅबचे पथकसुध्दा घटनास्थळी दाखल झाले होते.
आरोपी खासगी कंपनीत कामाला
मयत योगिता यांचे पती सोनारी काम करीत होते. तर दीपक हा बांभोरी येथील खासगी कंपनीत नोकरीला आहे. तसेच मुलगा आर्यन हा आठवीत शिक्षण घेतो. दरम्यान, या खूनप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.