शिस्त व ज्वलंत प्रश्नांना प्राधान्य देणार -मुख्याधिकारी गांगोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 03:59 PM2020-06-23T15:59:54+5:302020-06-23T16:01:26+5:30
ज्वलंत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
भुसावळ : पालिकेत उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने ज्वलंत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पालिकेच्या मुख्याधिकारी अधिकारी करुणा डहाळे यांना तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी किरण सावंत यांची मुख्याधिकारी पदी नेमणूक करण्यात आली होती. सावंत यांच्यावर सध्या कोरोना नियंत्रणासाठीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी चोपडा येथील मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत सोपविण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस ते भुसावळ पालिकेला देणार असून यासह कामाची आवश्यकतेनुसार ते भुसावळ कामांसाठी उपलब्ध राहतील.
जळगाव मनपा उपायुक्त म्हणून पाच वर्ष अनुभव तसेच दोंडाईचा नगरपरिषद येथे दीड वर्ष मुख्याधिकारी पदाचा अनुभव, तसेच किनवट, जि.नांदेड येथील मुख्याधिकारी पदाचा अनुभव असा मोठा अनुभव असणारे गांगडे यांनी १९ रोजी भुसावळ पालिकेच्या मुख्यअधिकारी पदाचा प्रभारी पदभार घेतला. घरापासून (पालिका कर्मचारी) शिस्त लावून शहरातील ज्वलंत समस्यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.