वाहन नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही सादर केलेले खुलासे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:14 AM2021-06-04T04:14:34+5:302021-06-04T04:14:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव आरटीओ कार्यालयात बीएस ४ ची २४०० वाहने नियमबाह्य नोंदणी झाल्याच्या आरोपांच्या प्रकरणात तत्कालीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव आरटीओ कार्यालयात बीएस ४ ची २४०० वाहने नियमबाह्य नोंदणी झाल्याच्या आरोपांच्या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व नोंदणी करणारे मोटार वाहन निरीक्षक नितीन अहिरे या दोन्ही अधिकाऱ्यांनी गुरुवारी आपले खुलासे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडे सादर केले.
दोन दिवसापूर्वीच श्याम लोही यांनी जिल्ह्यातील सर्व वितरकांकडून खुलासे मागविले होते व याबाबतचा लेखी अहवाल धुळे व नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना बुधवारी पाठविला होता. आता एप्रिल २०२० या कालावधीत कर्तव्यावर असलेले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व नितीन अहिरे यांच्याकडूनही खुलासे मागवण्यात आले होते. अहिरे यांनी ऑनलाईन नोंदणी केली तर मोरे यांनी प्रमुख म्हणून आदेश जारी केले होते. ३१ मार्च २०२० पर्यंत विक्री झालेल्या २५७ वाहनांची एप्रिल २०२० मध्ये ऑनलाईन नोंदणी केल्याचे अहिरे यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे. तर मोरे यांनी सर्वोच्च न्यायालयातील जनहित याचिका व परिवहन आयुक्तांच्या आदेशाचा संदर्भ देऊन ३१ मार्च पर्यंत प्रलंबित असलेल्या वाहनांची नोंदणी ३० एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांचे होते, त्यानुसार वाहन नोंदणीची प्रक्रिया त्या कालावधीत पूर्ण केली. वाहन बीएस ४ ही प्रणाली ऑनलाइन असल्याने डीलर डेटा, यामधील डेटा लपविता येत नाही. यात शासनाचे कुठलेही महसूली नुकसान झालेले नसून ही नोंदणी प्रक्रिया प्रचलित कार्यालयीन पद्धतीने करण्यात आलेली आहे.या काळात १५७ वाहनांची नोंदणी झालेली आहे. १ मे नंतर आपण वैयक्तिक रित्या कोणत्याही वाहनाची नोंदणी करण्याचे आदेश दिलेले नाहीत असेही मोरे यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.
परिवहन आयुक्तांकडून पडताळणी
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांचीही पोलिसांनी चौकशी केली असून त्यांचा लेखी जबाब नोंदविण्यात आलेला आहे. गजेंद्र पाटील यांची २४०० वाहनांची तक्रार व श्याम लोही यांनी १५७ वाहनांबाबत पाठवलेला खुलासा यातील नेमकी वस्तुस्थिती काय आहे? याची पडताळणी ढाकणे यांनी आपल्या स्तरावर संगणकीय प्रणाली तसेच अभिलेखावर केली आहे, त्यातही १५७ वाहनांची नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, ही चौकशी अद्यापही सुरूच असल्याचे सांगण्यात आले.