बेफिकरीमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:15 AM2021-04-06T04:15:36+5:302021-04-06T04:15:36+5:30
हातावर पोट भरणाऱ्यांपासून मध्यमवर्गीय तसेच सर्व क्षेत्रावर विपरीत परिणाम करणाऱ्या लाॅकडाऊनचे संकट पुन्हा एकदा जिल्ह्यावर ओढावले आहे. कोरोना नियंत्रणासाठीच्या ...
हातावर पोट भरणाऱ्यांपासून मध्यमवर्गीय तसेच सर्व क्षेत्रावर विपरीत परिणाम करणाऱ्या लाॅकडाऊनचे संकट पुन्हा एकदा जिल्ह्यावर ओढावले आहे. कोरोना नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात असलेल्या यंत्रणांसह नियमावलीचे पालन न करणाऱ्यांमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची नामुष्की ओढवली आहे. गेल्या दीड- पावणे महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दररोज रुग्ण संख्या वाढतच आहे. याशिवाय मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत असल्याने जिल्ह्यात स्थिती गंभीर होत आहे. गेल्या वर्षापेक्षा यावेळी कोरोनाचा संसर्ग गंभीर असल्याचे दररोजच्या रुग्णसंख्ये वरून स्पष्ट होत आहे. यात प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. विविध निर्णय घेत आदेश काढले जात आहे. मात्र अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी गर्दीवर नियंत्रण न मिळविल्याने संसर्ग झपाट्याने वाढत गेला. आदेश निघाल्यानंतर त्याची अंमलबजावणी संदर्भात जबाबदारी सोपविलेल्या संस्थांनी बाजारपेठेत ना गर्दीवर नियंत्रण मिळविले ना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईत सातत्य ठेवले. यामुळे बाजारपेठेत गर्दी कायम असून अनेक जण मास्कही वापरत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने उपाययोजना हाती घेण्यात येऊन जिल्ह्यात लॉकडाउन झाले. आताही पुन्हा तीच स्थिती उद्भवली आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊन मध्ये हळूहळू शिथिलता मिळत गेली व सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने सणासुदीच्या काळात सर्व व्यवहार सुरळीत झाले. पाच महिने कोरोनाविषयी फारसी चिंता नसल्याचे चित्र जिल्ह्यात होते. मात्र लग्नसराई सुरू झाली आणि गर्दी वाढली. यासोबतच ग्रामपंचायत निवडणुका व इतर मेळाव्यांद्वारे गर्दी झाल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा पसरू लागला. हळूहळू ही संख्या वाढत जाऊन आता हजाराच्या पुढे दररोज रुग्ण संख्या समोर येत आहे. मृत्यूंची संख्या देखील गेल्या वर्षापेक्षा अधिक असून अजूनही याविषयी गांभीर्य न बाळगल्याने स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. प्रशासनाच्यावतीने विविध निर्बंध घालणे, जनता कर्फ्यू असे विविध निर्णय घेण्यात आले. मात्र यात जनता कर्फ्यू व निर्बंधाच्या पहिले होणारी गर्दी यंत्रणांना टाळता आली नाही व एका दिवसात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढून संसर्ग झपाट्याने पसरण्यास हातभार लागला, असे जाणकारांचे म्हणणे आहे. रुग्णालयात खाटांची संख्या, पुरेसे ऑक्सिजन, औषध उपचार वाहने, मनुष्यबळ याविषयी उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे, हे स्वागतार्ह आहे मात्र आदेशाच्या अंमलबजावणी बाबत यंत्रणांनीदेखील गांभीर्य ठेवल्यास परिस्थिती वेळीच नियंत्रणात येऊ शकते. शिवाय याला जनतेचीही साथ तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन केल्यास अर्थचक्र सुरळीत राहण्यास हातभार लागू शकतो. त्यामुळे आता तरी सर्वांनी सावध होणे गरजेचे असून गर्दी टाळणे व नियमांचे पालन करणे गरजेचे ठरणार आहे.