कोणतीही पूर्वसूचना न देता कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना केले कार्यमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:09+5:302021-07-03T04:12:09+5:30
जळगाव : कोरोना काळात कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या व सध्या मोहाडी महिला रुग्णालयात वर्ग करण्यात आलेल्या कंत्राटी पद्धतीवरील ...
जळगाव : कोरोना काळात कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या व सध्या मोहाडी महिला रुग्णालयात वर्ग करण्यात आलेल्या कंत्राटी पद्धतीवरील ६४ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता २ जुलै रोजी कार्यमुक्त करण्यात आले आहे. याविषयी सदर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून हा अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे अशा कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश राज्य पातळीवरून येत नाही तोपर्यंत कार्यमुक्त करू नये, असे आदेश असताना कार्यमुक्त करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर तसेच रुग्णालयांमध्ये कंत्राटी पद्धतीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यात जवळपास ७५० असे कर्मचारी आहे. यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने इकरा कोविड केअर सेंटरमधील ६४ कर्मचाऱ्यांना मोहाडी महिला रुग्णालयात वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर आता कोणतीही पूर्वसूचना न देता २ जुलैपासून या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली व्यथा
कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन आपली व्यथा मांडली व अन्याय दूर करण्याविषयीचे निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटात न डगमगता सेवा दिली. तसेच सध्या कोरोनामुक्ती विषयी कोणतेही आदेश नसताना कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. यात केवळ इकरा कोविड सेंटरमधून मोहाडी रुग्णालयात वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे इतर जण कामावर असताना आमच्यावरच हा अन्याय का, असा सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यस्तरावरून आदेश नाही
कोरोना काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्यस्तरावरून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत कार्यमुक्त करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. तसे आदेश नसताना कार्यमुक्त करण्यात आल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.