येथील सुसगाव रोड लगत असलेल्या दत्तनगर परिसरातील रहिवाशांचे सांडपाणी गेल्या सात ते आठ वर्षांपासून समर्थ कॉलनीला लागून असलेल्या मुख्य गटारीकडे वाहत होते. या पाण्याला नैसर्गिक उतार तिकडेच होता; मात्र दत्तनगर गटाराचे सांडपाणी दुसऱ्या गटात नको, या मानसिकतेतून वाद उद्भवला. त्यातच एका गटातील रहिवाशांनी मातीचे डंपर टाकून पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला. दत्तनगर रहिवाशांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दिली; मात्र ग्रामपंचायतीचे प्रशासक व अधिकाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली. रहिवाशांच्या बाथरूममध्ये पाणी तुंबले. पुढे हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. सांडपाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे; मात्र ग्रामपंचायतीच्या तिजोरीत ठणठणाट आहे. वार्डाचे पदाधिकारी नाही. अखेर लालचंद पाटील यांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे इंजिनियर बोलावून मोजमाप केले व तातडीने टेंडर मंजूर करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. गटारीची आखणी करण्यात आली असून, शुक्रवारपासून कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
नशिराबादला सांडपाण्यावरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:16 AM