जळगाव - महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय विभागाच्यावतीने 'माझी वसुंधरा अभियान - २०-२१' या राज्यस्तरीय अभियानात जिल्ह्याचे उत्कृष्ट व सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल ' सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी ' या पुरस्काराने ऑनलाइन सन्मानित करण्यात आले. या अनुषंगाने मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाउंडेशनतर्फे फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख व फाउंडेशनचे सहकारी प्रवीण धनगर, हेमंत सोनार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा सत्कार करण्यात आला. फाउंडेशनचे मोनाली कुमावत, अभिजित रंधे, आदी उपस्थित होते.
प्रजापतनगर स्मशानभूमीचे भूमिपूजन
जळगाव - शिवाजीनगर परिसरातील प्रजापतनगर स्मशानभूमीची झालेली दुरवस्था लक्षात घेता रोटरी क्लब स्टार्सच्या माध्यमातून विकास कामांचा शुभारंभ महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. प्रजापतनगर स्मशानभूमीत नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेता नगरसेवक किशोर बाविस्कर व नवनाथ दारकुंडे यांनी मनपाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. दरम्यान, लोकसहभागातून स्मशानभूमीची दुरवस्था बदलता येणे शक्य असल्याने रोटरी क्लब स्टार्सच्या माध्यमातून कामांचे नियोजन करण्यात आले. महासभेच्या ठरावानंतर गेल्या कामाला सुरुवात करण्यात आली.
१४ कृषी केंद्रांना कृषी अधीक्षकांनी बजावली नोटीस
जळगाव - जिल्ह्यातील सर्व बियाणे विक्रेत्यांना आपल्या दुकानात बियाणे, खतं, साठा व भावफलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे; मात्र अनेक विक्रेत्यांकडून या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. मंगळवारी जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी पारोळा, पाचोरा, जामनेर व मुक्ताईनगर तालुक्यातील कृषी सेवा केंद्राची अचानक पाहणी केली. या पाहणीमध्ये काही दुकानदारांकडे त्रुटी आढळून आल्या. अशा १४ दुकानदारांना कृषी अधीक्षकांकडून नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. दरम्यान, कृषी विभागाकडून तपासणी मोहीम राबविण्यात आली असून, बियाणे, खतांची जादा दराने विक्री करणे, साठा करताना आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.