जळगाव : राज्य सरकारने मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यात सर्व मतदारांचे छायाचित्र यादीत घेतले जात आहे.
जानेवारी २०२१ मध्ये जिल्ह्यातील २०,१२७ मतदारांचे फोटो यादीत समाविष्ट करण्यात आले नव्हते. या मतदारांचे फोटो यादीत घेतले गेले नव्हते. त्यामुळे या याद्या अद्ययावत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहीम हाती घेतली आणि जूनअखेर सर्व फोटो याद्यांमध्ये समाविष्ट केले गेले. जिल्ह्यात ३४ लाख १९ हजार ४५८ एकूण मतदार आहेत. या सर्व मतदारांचे फोटो मतदान यादीत असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली. जिल्ह्यात जानेवारी महिन्यात हाती आलेल्या आकेडवारीनंतर निवडणूक विभागाने मोठी मोहीम हाती घेतली. त्यात मतदान केंद्रनिहाय याद्यांमध्ये कोणत्या मतदाराचा फोटो नाही याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर ही यादीत मतदाराचा फोटो अद्ययावत करण्याची जबाबदारी बीएलओ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. त्यानुसार प्रत्येक बीएलओंनी आपल्या यादीत कुणाचा फोटो नाही. त्या प्रत्येक मतदाराशी किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यानंतर जे मतदार हयात आणि स्थानिक रहिवाशी होते, त्यांचे फोटो त्यात अद्ययावत करण्यात आले. या यादीतील काही मतदार हे मयत झाले होते तर काही मतदार स्थलांतरित झाले होते. त्यांची पूर्ण माहिती घेऊन त्यांची नावे वगळण्यात आली.
एकूण मतदार - ३४ लाख १९ हजार ४५८
स्त्री मतदार १६ लाख ३८ हजार २६९
पुरुष मतदार - १७ लाख ८१ हजार ३०७
तृतीयपंथी मतदार ८२
सर्व मतदारसंघात याद्या झाल्या पूर्ण
जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात याद्या फोटोंसह पूर्ण झाल्या आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या अहवालातदेखील जळगाव, धुळे आणि सांगली या तीन जिल्ह्यांनी आपल्या मतदार याद्या शंभर टक्के अद्ययावत केल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यानुसार या याद्या तयार करण्यात आल्या आहेत.
कोट -
जिल्ह्यात जानेवारी महिन्यात मतदार याद्यांमध्ये २०,१२७ मतदारांचे फोटो नव्हते. हे फोटो नंतरच्या सहा महिन्यांच्या काळात पूर्ण मेहनत घेऊन आणि त्याचे नियोजन करून या यादीत टाकण्यात आले. या २० हजार १२७ मतदारांसोबत किंवा त्यांच्या नातेवाइकांसोबत निवडणूक विभागाने बीएलओंमार्फत वैयक्तिक संपर्क साधून त्यांचे फोटो यादीत अद्ययावत करून घेतले आहे. जिल्ह्यातील मतदार यादीत १०० टक्के फोटो आहेत.
- तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी
विधानसभा एकूण मतदार
चोपडा ३,०९,१५३
रावेर २,९१,९८४
भुसावळ ३,०२,९१८
जळगाव शहर ३,८६,५६९
जळगाव ग्रामीण ३,११,२३७
अमळनेर २,९१,९८४
एरंडोल २,७८,२७१
चाळीसगाव ३,५०,०२३
पाचोरा ३,१०,३३६
जामनेर ३,०८,५२३
मुक्ताईनगर २,८८,०६१