आली दिवाळी : वसूबारसने प्रकाशोत्सवास प्रारंभ, पांझरापोळ संस्थानमध्ये पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:38 PM2018-11-04T12:38:43+5:302018-11-04T12:39:31+5:30
खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी
जळगाव : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघणाऱ्या प्रकाशोत्सवास अर्थात दिवाळी सणाला रविवारी वसू बारसने प्रारंभ झाला असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. विविध वस्तूंच्या खरेदीसह पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी शनिवारी ग्राहक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. रविवारी वसूबासरनिमित्त जळगाव शहरातील पांझरापोळ संस्थानमध्ये श्रीराम रांगोळी ग्रुपतर्फे पूजन करण्यात आले.
महात्मा गांधी रोड, फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट या परिसरात कपड्यांच्या दुकानांवर खरेदीसाठी तरुणाईसह पुरुष, महिला, लहान मुलांची प्रचंड गर्दी झालेली होती. आकाशकंदील, विविध प्रकारच्या रंगीत दिव्यांच्या माळा (लाईटिंग) खरेदीला प्राधान्य दिले जात होते. बाजारात १०० रुपये ते ८०० रुपयांपर्यंत विविध प्रकारचे आकाशकंदील उपलब्ध आहेत.
केरसुणी, लक्ष्मीची मूर्ती, लाह्या-बत्तासेंना मोठी मागणी
बाजारपेठेत थाटलेल्या पुजेच्या साहित्याच्या प्रत्येक दुकानावर शनिवारी गर्दी झालेली होती. केरसुणी, लक्ष्मीची मूर्ती, लाह्या-बत्तासे यांची आजच खरेदी करून ठेवण्यात येत असल्याचे दिसून आले. लक्ष्मीच्या मूर्ती ६० रुपये ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध होत्या. या सोबतच लक्ष्मीपूजनात अनन्य महत्त्व असलेल्या केरसुणी २० ते ४० रुपये प्रति नग विक्री होत होत्या. लहान आकाराच्या केरसुणींनादेखील मागणी असून त्या १५ रुपयांपासून उपलब्ध आहे. या सोबतच लाह्या ६० रुपये किलो तर बत्तासे ७० ते ८० रुपये किलोने विक्री होत आहे.
विविध रंगांच्या रांगोळींना मागणी
लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी अंगणात रांगोळी काढण्यालादेखील मोठे महत्त्व असल्याने विविध रंगांच्या रांगोळींनी दुकाने सजली आहेत. पांढरी रांगोळी १५ रुपये किलो विक्री होत असून पाच रुपयांपासून रंगीत रांगोळीचे पाकीट उपलब्ध आहेत.
विविध आकारातील पणत्या वेधताहेत लक्ष
घर, अंगण उजळून टाकणाºया पणत्या विविध आकार, प्रकारात विक्रीस आल्या असून त्या वेगवेगळ््या रंगातदेखील उपलब्ध आहे. पारंपरिक गोलाकार पणत्यांसह नक्षीकाम केलेल्या पणत्या लक्ष वेधून घेत आहे. या सोबतच बोळकेदेखील वेगवेगळ््या रंगात उपलब्ध आहेत.
पावले, स्वस्तिकच्या स्टीकरलाही मागणी
दरवाजा, देव्हाºयासमोर रंगीत पावले, वेगवेगळ््या नक्षी, स्वस्तिकचे स्टीकर लावण्यालादेखील पसंती दिली जाते. त्यामुळे त्यांचीदेखील अनेक दुकाने लागली असून त्या ठिकाणीही मोठी उलाढाल होत आहे. दहा रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत हे स्टीकर उपलब्ध आहे.
फुले मार्केटमधील वाहनतळ फुल्ल
महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी वाहनतळही अपूर्ण पडले. तेथे वाहने लावण्यास जागा नव्हती. अनेक जण बाहेर इतरत्र वाहने लावून खरेदी करताना दिसून आले.
वाहनधारकांची कसरत
बाजारपेठेत खरेदीसाठी एवढी गर्दी वाढली की, रस्त्यांवरून वाहने काढणेदेखील कठीण झाले होेते. त्यामुळे टॉवर चौक, चित्रा चौक, नवीपेठ या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
वसू बारस
रविवारी गोवत्सद्वादशी. अर्थात वसूबारस असून गाय-वासरूच्या पूजनाने दिवाळीस प्रारंभ होत आहे. वसू या शब्दाचा अर्थ धन किंवा द्रव्य असा आहे. या दिवशी सवत्स गायीचे अर्थात वासरूसह गायीचे पाद्यपूजन व औक्षण करावे. घरात सदैव लक्ष्मीचे आगमन होते, असे म्हणतात. गायीला बाजरी व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून सुखसमृद्धीची प्रार्थना केली जाते.