डॉक्टर पतीला जन्मठेप तर सासऱ्याला चार वर्ष कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:07+5:302021-05-14T04:16:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत (३५, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव प्रथमवर्ग न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या रेखा ऊर्फ विद्या भरत राजपूत (३५, रा. सुपारीबाग, जामनेर) यांच्या खून प्रकरणात पती डॉ. भरत लालसिंग पाटील याला कलम ३०२ अन्वये जन्मठेप तर व सासरे लालसिंग श्रीपत पाटील (७४, रा. बेलखेडे, ता. भुसावळ) यांना कलम २०१ अन्वये न्यायालयाने चार वर्षे कैदेची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी गुरुवारी हा निकाल दिला. नातेवाईकांनी दिलेल्या साक्षी, मोबाईल सीडीआर व फाॅरेन्सिक अहवाल यात महत्त्वाचा ठरला आहे.
ॲड.विद्या राजपूत यांचा १३ जानेवारी रोजी उशीने तोंड व गळा दाबून खून झाला होता. पती डॉ. भरत लालसिंग पाटील व सासरे लालसिंग श्रीपत पाटील या दोघांना या गुन्ह्यात अटक केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पती कारागृहात होता तर सासरा लालसिंग पाटील हा जामिनावर होता. निकालानंतर न्यायालयाने दोघांना अटक करण्याचे आदेश दिले.
संशयायनम: विनाशाय!
निकाल देताना न्यायालयाने संशयानम: विनाशाय! या संस्कृतमधील म्हणीचा संदर्भ दिला. संशय आला की विनाश होतो असे पती डॉ.भरत याला सुनावले. विद्या राजपूत यांच्या चारित्र्यावर पतीकडून सतत संशय घेतला जात होता. त्या सतत मोबाइलवर बोलत असत त्यामुळे त्यांच्यावर अधिक संशय घेतला जात असल्याचे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी न्यायालयात सांगितले.
यांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
या खटल्यात १९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यापैकी १४ साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. त्यात फिर्यादी गणेश सुरळकर, ज्या डॉक्टरांकडे विद्या यांना उपचारासाठी नेण्यात आले ते डॉ.राहुल जावळे, डॉ. राजेश मानवतकर, चुलत भाऊ सुरज सरदारसिंग पाटील, ज्या वाहनातून त्यांना दवाखान्यात व नंतर अंत्यसंस्काराला नेण्यात आले त्याचा चालक विपुल गोपाल पटेल, मुलगा दुर्वेश उर्फ सोनू भरत पाटील, बहिण प्रिया प्रमोद सोळुंखे, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील चंद्रकांत कळसकर,वरणगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन प्रभारी अधिकारी सारिका कोडापे, जामनेर शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा, जळगाव न्यायालयातील सरकारी वकील सुप्रिया सुरेश क्षीरसागर, जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, शवविच्छेदन करणारे डॉ. नीलेश देवराज व जामनेरचे वकील ज्ञानेश्वर बाबुराव बोरसे आदींच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत.