जळगाव : कोरोना बाधित आपल्या डॉक्टर असलेल्या वडिलांना वाचविण्यासाठी डॉक्टर मुलाने पुणे येथून जळगाव गाठले, स्वत: पुण्याला आपात्कालीन विभागात सेवा बजावत असल्याने येथेही वडिलांवर उपचार करण्याची परवानगी मागितली मात्र, प्रोटोकॉलमुळे त्यांना उपचार करता आले नाही, अखेर वडिलांची प्राणज्योत मालावल्याचा धक्कादायक प्रकार कोरोनाच्या संकटामुळे ओढावला.अडावद ता़ चोपडा येथील एका डॉक्टरांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला़ गेल्या दहा दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती आहे़ डॉक्टरांचे नातेवाईक व कुटुंबिय २२ मार्च पर्यंत क्वारंटाईन होते़ मध्यंतरी रुग्णांचा आग्रह वाढल्यामुळे २२ नंतर या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली़ काही दिवसांनी संबंधित डॉक्टरांना ताप आला़ मध्यंतरी न्यूमोनिया व प्रकृती अधिक खालावल्याने त्यांचे बंधू व कुटुंबियांनी त्यांना जळगावला कोरोना रुग्णालयात हलविले़ या ठिकाणी तपासणी केल्यानंतर दोन दिवसांनी त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले़ नेमकी त्यांना लागण कशी झाली याची ठोस माहिती समोर आलेली नाही़ सुरूवातीचे काही दिवस प्रकृतीत सुधारणा होत होती़ मात्र, मधुमेह, हृदयविकार, हर्निया या व्याधी असल्याने प्रतिकारक क्षमता आधीच कमी होती़ त्यात त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली. अखेर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले़ यातच रात्री त्यांचा मृत्यू झाला़ कोरोना रुग्णालयात गेल्या दोन दिवसात सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यातील एक रुग्ण वगळता अन्य सर्व हे वृध्द व मधुमेह, हृदयविकारा अशा व्याधींनी ग्रस्त होते. पाचोरा येथील रुग्णाला मात्र अशी कोणतीही दुसरी व्याधी नव्हती. चौघांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी तर दोघांच्या शनिवारी करण्यात आली.पुणे येथे कोरोनाचे गंभीर रुग्ण हाताळणाऱ्या त्यांच्या डॉक्टर मुलाला वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली़ पुण्यात गंभीर रुग्णांचेही बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे वडिलांना पुणे येथे घेऊन जावून तेथे उपचार करण्याची मागणी या डॉक्टरांनी प्रशासनाकडे केली मात्र, नंतर अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे प्रशासनानेही त्यांना नकार दिल्याचे वृत्त आहे़एका रात्री कोरोना कक्षात दाखल या डॉक्टरला आॅक्सिजन लावण्यात आले होते़ मात्र, अचानक ते सिलींडर संपले, त्यांना त्रास व्हायला लागला मात्र, त्या ठिकाणी कुणीही नव्हते़ त्या रुग्ण डॉक्टरांनी नातेवाईकांना फोन करून त्रास होत असल्याचे सांगितल्यानंतर मुलाने कक्षात पाहणी केली असता सिलेंडर संपल्याचे समजले़ हा प्रकार धक्कादायक असल्याचे या नातेवाईकाचे म्हणणे आहे़सिलिंडरबाबतची माहिती चुकीची आहे. आपल्याकडे पुरेसे आॅक्सिजन सिलेंडर असून डॉक्टर व कर्मचारी पूर्णवेळ रुग्णांवर लक्ष ठेवून असतात.-डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
वडिलांच्या जीवासाठी डॉक्टर मुलाचा आटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 1:01 PM