कुणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:13 AM2021-04-03T04:13:29+5:302021-04-03T04:13:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक नव्या बाबी समोर येत आहेत. यात गंभीर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक नव्या बाबी समोर येत आहेत. यात गंभीर व ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. शिवाय कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेकांना श्वास घ्यायला त्रास होण्याची समस्या असते. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर सोडून हवेतून ऑक्सिजन देणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर या मशिनीच्या दरात मागणीत गेल्या दोन महिन्यांपासून दुपटीने वाढ झाली आहे. दुसरीकडे शहरात मागणी जास्त असताना मशीन मात्र, कमी असल्याचे चित्र आहे. अनेक संस्था अनामत रक्कम व काही दर आकारून याचा पुरवठा करीत आहेत.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे मशीन हवेतून ऑक्सिजन घेऊन ते रुग्णाला पुरवठा करीत असते. जनकल्याण समिती तसेच भारत विकास परिषदेच्या संपर्क फाऊंडेशनच्या माध्यमातून याचा ऑक्टोबरपासून पुरवठा केला जात होता. जस जशी मागणी वाढत गेली या मशिनची संख्याही वाढविण्यात आली. यात आता दोनही संस्थांकडे एकूण १८ मशीन आहेत. दरम्यान, नव्याने काही संस्था व संघटनांनी या मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. यात राजस्थानी ग्रूपकडून तीन मशीनपैकी दोन मशिन देण्यात आल्या आहेत. मागणी मोठी असल्याचे जयेश ललवाणी यांनी सांगितले. सुधर्म जैन श्रावक संघाकडूनही मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरम्यान, आमच्याकडे जळगावात तीन आणि अमळनेरला एक मशीन आहे. त्यातील दोन मशीन रुग्णांना दिल्या आहेत. ही मशीन अत्यंत उपयुक्त असून सेवाभावी संस्थांनी, दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अशा मशीन उपलब्ध केल्यास त्याचा चांगला फरक जाणवेल, मागणीत मोठी वाढत असल्याचे ललित बरडिया यांनी सांगितले.
जिथे सिलिंडर नाही तेथेच वापर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मध्यंतरी ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आल्या होत्या. काही वेळा काही कक्षांमध्ये याचा उपयोगही करण्यात आला होता. मात्र, या संपूर्ण रुग्णालयात ऑक्सिजन पाईपलाईन असून शिवाय टँकच्या सहाय्याने व सिलिंडरच्या सहाय्यानेच रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे.
कोट
ऑक्टोबर महिन्यापासून मागणीला सुरुवात झाली. मात्र, गेल्या दोन महिन्यात यात वाढ झाली आहे. दिवसाला साधारण २५ ते ३० कॉल या मशिनच्या मागणीसाठी येत आहेत. शहरात किमान शंभर मशिनची अद्याप आवश्यकता आहे. - तुषार तोतला, चेअरमन, संपर्क फाऊंडेशन
कोणाला मशिन उपयोगी
कोविडच्या किंवा कोविड सदृश्य विषाणूमुळे न्यूमोनिया झाल्यास बरे होण्यासाठी बराच कालावधी लागतो. लंग फायब्रोसीस होतो. अशा स्थितीत रुग्णाला जास्त काळ रुग्णालयात ठेवता येत नाही. मात्र, त्याला ऑक्सिजन द्यावे लागते. अशा स्थितीत रुग्णांना घरी ऑक्सिजन कॉन्सस्ट्रेटरद्वारे ऑक्सिजन दिले जाऊन शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.