खेडेगावात कुणी डॉक्टर देता का डॉक्टर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:29+5:302021-06-24T04:12:29+5:30
स्टार डमी : 839 लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना काळात वर्षभरात शासनातर्फे १५ बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टर जिल्ह्यात पाठवण्यात ...
स्टार डमी : 839
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना काळात वर्षभरात शासनातर्फे १५ बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टर जिल्ह्यात पाठवण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी दोन जणांनी खेडेगावात जाण्यास नकार दिला आहे. सध्या पहुर आणि धरणगाव येथील डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत.
कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता ही बाब आरोग्य यंत्रणेत सर्वात डोकेदुखी ठरली होती. कमी मनुष्यबळात जास्त ताण आला होता. त्यात जिल्ह्यात बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १५ जागा आहेत. त्यापैकी १३ जण आपल्या बंधपत्रानुसार कामाच्या जागी रुजू झाले आहेत. मात्र दोघांनी त्याला नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
रिक्त जागांवर अशी केली जाते व्यवस्था
ज्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. त्या ठिकाणी स्थानिक स्तरावर डॉक्टर वर्षभरासाठी नियुक्त केले जातात. स्थानिक असल्याने यांना इतर अडचणींचा सामना करावा लागत नाही. आणि ते लवकर तयार देखील होतात. त्याशिवाय अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बीएएमएस डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत.
दोन जागा रिक्त
जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, आणि ग्रामीण रुग्णालय, कुटीर रुग्णालय येथे एमबीबीईएस डॉक्टरांच्या १५ जागा आहेत. त्यातील १३ डॉक्टर जिल्ह्यात कार्यरत आहेत. तर पहुर आणि धरणगाव येथील जागा रिक्त आहेत. त्या ठिकाणी दोन जण अद्याप रुजु झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किती डॉक्टर नियुक्त आहेत. याची माहिती उपलब्ध झाली नाही.
कारणे काय
- एमबीबीएस झाल्यावर मेडिकल बॉण्डवर डॉक्टरांना ग्रामीण भागात सेवा द्यावी लागते. मात्र तसे न केल्यास १० लाख रुपये भरून या बॉण्डमधून त्यांना मुक्तता मिळते. काही जण पैसे भरून या बॉण्डमधून मुक्त होतात.
- अनेकजण उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी मेडिकल बॉण्ड पूर्ण करत नाहीत. एम.डी. तसेच अन्य उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागात येण्यास त्यांचा नकार असतो.
- ग्रामीण भागात सोयी, सुविधा नसणे, बहुतेक ठिकाणी जाण्यासाठी धड रस्ता देखील नसणे, यामुळे अनेक जण येण्यास नापसंती दर्शवत आहेत.
वर्षभरातील नियुक्ती १५
रिक्त जागा २
कोट - सध्या जिल्ह्यात १५ जागा या मेडिकल बॉण्डवर असलेल्यांच्या आहेत. त्यापैकी पहुर आणि धरणगाव या रुग्णालयातील जागा रिक्त आहेत. रिक्त असलेल्या जागांवर स्थानिक करार करून डॉक्टर रुजु करून घेतले जातात - डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक
कोट - गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ग्रामीण भागात कार्यरत आहेत. मात्र येथे कोणत्याही सुविधा नाहीत. अपुऱ्या सोयी-सुविधांमध्ये काम करावे लागत आहे. त्यामुळे अनेकवेळा बॉण्ड सोडून जाण्याची इच्छा होते. शासनाने किमान सुविधा तरी द्याव्यात. - एक डॉक्टर
कोट - राज्य शासनाने बॉण्डवर येथे पाठवले आहे. मात्र येथे येण्यासाठी रस्ता धड नाही. तसेच येथे पुरेशा सुविधा देखील नाहीत. सुविधा लवकर पुरवाव्या. तसेच पगार देखील वेळेत करावेत - एक डॉक्टर