लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खान्देशातील वातावरण पाहता सर्वसामान्य व्यक्तीच्या शरीराला दिवसाला तीन ते चार लीटर पाणी पुरेसे ठरते; मात्र अनेक जण हे सोशल मीडियावर आलेल्या विविध मेसेज वाचून त्यापेक्षा जास्त पाणी पितात. किंवा अनेक जण पाणी पिण्याचा कंटाळा करतात; मात्र असे न करता सामान्य तंदुरुस्त व्यक्तीने दिवसाला तीन ते चार लीटर पाणी पिणे पुरेसे ठरते.
गेल्या काही वर्षांमध्ये पाणी किती प्यावे आणि कोणत्या वेळी काय खावे, याचे संदेश प्रसारित होत आहेत. पाणी शरीरासाठी जेवढे आवश्यक आहे. तेवढेच कमी पाणी पिणे, हे नुकसान करते. जास्त पाणी पिल्याने शरीरावर सूज येऊ शकते किंवा शरीरातील सोडियमचे प्रमाणदेखील कमी होते.
शरीरात पाणी कमी पडले तर...
शरीरात पाणी कमी पडले, तर त्याचा किडनीवर दुष्परिणाम होतो. त्यात युरीन इन्फेक्शन होणे, डिहायड्रेशन होणे, मुतखडा होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो, तसेच ज्यांना आधीच मुतखड्याचा विकार आहे, त्यांनी पाणी घेतले तर त्यांना वारंवार मुतखडा होऊ शकतो.
शरीरात पाणी जास्त झाले तर...
शरीरात पाणी जास्त झाले तर त्याचाही शरीरावर विपरीत परिणाम होतो. गरजेपेक्षा जास्त पाणी घेतले. तर किडनी हे सर्व पाणी बाहेर फेकू शकत नाही. त्यामुळे शरीरातील सोडियम कमी होणे, शरीरावर सूज येणे अशा समस्या उद्भवतात; तसेच किडनीचे विकार असतील तर पाणी योग्य प्रमाणात पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो
कोट - आपल्या भागातील वातावरणानुसार आम्ही तीन लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतो, तसेच किडनीचे विकार असतील तर ८०० मिलीपर्यंतच पाणी दिले गेले पाहिजे. कमी पाणी पिल्याने जसा त्रास होतो, तसेच पाणी जास्त पिल्यानेदेखील शरीरावर दुष्परिणाम होतात. त्यात सूज येणे, सोडियमचे प्रमाण कमी होणे, अशा समस्यांचा सामना करावा लागतो. - डॉ. अमित भंगाळे, युरोलॉजिस्ट.