ग्रामस्थांनी पकडलेले वाळू ट्रॅक्टर घेऊन चालक पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:09 PM2019-07-04T12:09:18+5:302019-07-04T12:09:55+5:30
ग्रामस्थ व ट्रॅक्टर चालकामध्ये वाद
जळगाव / दापोरा : जळगाव तालुक्यात अवैध वाळूचा उपसा सुरूच असून विदगाव पाठोपाठ दापोरा येथेही वाळू उपशास विरोध करण्यावरून वाद झाला. दापोरा येथे ३ रोजी वाळू उपसा करणाऱ्यांना रोखण्यासाठी ग्रामस्थ थेट गिरणा नदी पात्रात उतरले. त्यावेळी वाळू उपशास विरोध करीत वाळूने भरलेले विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर पकडून नदीपात्रातून गावाकडे आणत असताना वाळू वाहतूकदार ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. दरम्यान, विदगाव येथून सहा वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेताना यावल तालुक्यातील कोळन्हावी ता. यावल येथील सरपंचांनी जमाव जमवून दगड फेक करण्याची धमकी देण्यासह ट्रॅक्टर पळवून नेणाºया मालक व चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याविषयीचे जळगावच्या तहसीलदारांनी यावल तहसीलदारांना पत्र दिले आहे.
दापोरा येथे गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सर्रासपणे केला जातो. यात वाळू वाहतूकदार गावकऱ्यांनादेखील जुमानत नाही. या बाबत त्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या तरी त्यास अवैध वाळूचा उपसा करणारे जुमानत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशाच प्रकारे ३ रोजी गिरणा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा सुरू असताना ग्रामस्थांनी थेट गिरणा पात्र गाठत वाळू वाहतूक करण्यास मज्जाव केला. त्या वेळी तेथे वाळूने भरलेले रवंजा ता.एरंडोल येथील विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर पकडून नदीपात्रातून गावाकडे आणत होते. मात्र मध्येच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाला.
वाहनधारकांकडून स्थानिक पदाधिकाºयांकडे बोट
ग्रामस्थानी वाहने अडवून ट्रॅक्टर महसूल यंत्रणेच्या ताब्यात देण्याविषयी सांगितले असता ट्रॅक्टर चालकाने नाव न घेता स्थानिक दापोरा व दापोरी येथील पदाधिकाºयांना विचारून वाळू वाहतूक करीत असल्याचे सांगितले. त्या वेळी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
महसूल प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
दापोरा येथील अवैध वाळू उपशाविषयी महसूल प्रशासनास कळवूनदेखील कोणतीही कारवाई होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. महसूल प्रशासनाने अवैध वाळूचा उपसा करणाºया वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
कर्मचाºयांना ढकलून देत ट्रॅक्टर घेऊन पसार
विदगाव येथे तापी नदी पात्रातून वाळू भरणाºया ९ ट्रॅक्टरवर कारवाई करीत ते घेऊन महसूलचे कर्मचारी येत असताना त्यातील सहा ट्रॅक्टरच्या मालक व चालकांनी पथकातील कर्मचाºयांना दमदाटी करून त्यांना ढकलून दिले व ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. या विषयी महसूल पथकाने चौकशी केली असता त्यात विकास जगन्नाथ साळुंखे (ट्रक्टर मालक), गोपाल प्रल्हाद साळुंखे, जगदीश संजय साळुंखे (चालक), मच्छिंद्र कौतिक साळुंखे (मालक), चैतन्य मच्छिंद्र साळुंखे (चालक), ज्ञानेश्वर कडू साळुंखे (चालक, मालक), गोलू ज्ञानेश्वर साळुंखे (चालक, मालक), बापू नारायण साळुंखे (चालक, मालक), पद्माकर सोपान साळुंखे, नामदेव मुकुंदा साळुंखे (चालक, मालक), सर्व रा. कोळ न्हावी, ता. यावल यांचा समावेश असल्याचे समजले.
सरपंचाने दिली दगडफेकीची धमकी
विदगाव येथे तापी नदी पात्रात कोळन्हावी येथील सरपंच गोटू साळुंखे हे मोठा जमाव घेऊन आले होते व ट्रॅक्टर नेले तर दगड फेक करू, अशी धमकी देत होते, असे जळगावच्या तहसीलदारांनी यावलच्या तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सोबतच शासकीय कामात अडथळा आणण्यासह पथकातील कर्मचाºयांना दमदाटी करीत वाहनावरून ढकलून देणे, दमदाटी केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याविषयी पत्र दिले आहे.
दापोरा वाळू उपशाविषयी ‘महसूल’ अनभिज्ञ
दापोरा येथे गिरणा नदीपात्रातून वाळू उपशाविषयी तसेच ग्रामस्थ व ट्रॅक्टर चालकामध्ये झालेल्या वादाविषयी महसूल पथकास माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
ट्रॅक्टर केले जप्त
विदगाव येथून पळवून नेलेले ट्रॅक्टर पकडून ते जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती जळगावच्या तहसीलदार वैशाली हिंगे यांनी दिली.
दापोरा येथे वाळू उपशावरून वाद झाल्याविषयीची माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही. विदगाव येथून नदीपात्रातून पळवून नेलेले ट्रॅक्टर जमा करण्यात आले आहे.
- वैशाली हिंगे, तहसीलदार, जळगाव.